esakal | भुजबळ-कांदे वाद : अक्षय निकाळजे म्हणतात, तो आमदार कांदेंचा ‘पब्लिसिटी स्टंट’
sakal

बोलून बातमी शोधा

Suhas Kande Chhagan Bhujbal

अक्षय निकाळजे म्हणतात, तो आमदार कांदेंचा ‘पब्लिसिटी स्टंट’

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप प्रकरणी उच्च न्यायालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे. ती याचिका काढून घ्या, अशी धमकी छोटा राजनचा पुतण्या असल्याचे सांगणाऱ्या अक्षय निकाळजे याने दिली, अशी तक्रार शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मंगळवारी (ता. २८) नाशिकच्या पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे दिली. त्यास २४ तास होत नाहीत तोच रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी भुजबळ यांच्याशी आमचा संबंध नाही, त्यांच्याविरोधातील याचिका मागे घेण्याची धमकीचा संबंध नाही, कांदे यांचा ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचा आरोप निकाळजे यांनी केला.

निकाळजे यांच्या स्पष्टीकरणामुळे भुजबळ आणि कांदे यांच्यातील वादाला कलाटणी मिळाली. मुंबईहून पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी भुजबळ हे नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘मी भाई युनिव्हर्सिटीमध्ये गेलो नसल्याने त्यात मला घेऊ नका’, अशा शब्दांत भुजबळ प्रतिवार यांनी केला. ते म्हणाले, की कांदे यांना दिलेल्या धमकीची चौकशी व्हायला हवी. दोषींविरुद्ध कारवाई व्हायला हवी. पण राजकीयदृष्ट्या आपल्यावर गंभीर आणि खोटे आरोप लावले जात आहेत, त्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा. अशा आरोपांमुळे एवढ्या दिवसांची तपश्‍चर्या पुरासारख्या पाण्यात वाहून जाते की काय? असे वाटायला लागले. तरीही ‘पब्लिक सब जानती है’. यांनी भुजबळ यांचे नाव घेतले नसल्याचे म्हटले आहे. परंतु पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीमध्ये तोच संदर्भ ठेवला आहे.

हेही वाचा: छोटा राजनच्या 'त्या' धमकीला भीकही घालत नाही - आ. कांदे


अक्षय निकाळजेंची माहिती

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना निकाळजे म्हणाले, की आमचे काही कार्यकर्ते पनवेलमार्गे मुंबईला येत होते. त्यांना टोलनाक्यावर तीस ते चाळीस जणांनी बेदम मारहाण केली. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एकजण रुग्णालयात दाखल आहे. त्याची माहिती मिळाल्यावर मी कांदे यांना फोन केला. कांदे यांनी तो टोलनाका माझा भाऊ चालवतो, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे सांगितले. तसेच, माझ्यावर मोक्काची कारवाई झाली आहे, माझ्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे माझ्याशी संभाळून बोला, अशी माहिती विचारण्यासाठी तुम्ही आमदाराला फोन का करता? पुन्हा फोन करू नका, अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, असेही कांदे यांनी सांगितले. याप्रकरणात मी भुजबळ यांचे नाव घेतले नाही. त्यांना मी कधीही भेटलेलो नाही. ते मोठे नेते आहेत. तरीही कांदे यांनी आमच्यावर आरोप करून कुभांड रचले. हे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचे अपयश आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीला आम्ही तयार आहोत. कांदे यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

हेही वाचा: भुजबळांविरोधातील तक्रार मागे घ्या, आमदार कांदेना छोटा राजन गॅंगचा फोन

loading image
go to top