esakal | छोटा राजनच्या 'त्या' धमकीला भीकही घालत नाही; मुख्यमंत्र्यांच्या कानावर प्रकरण पोहचलंय
sakal

बोलून बातमी शोधा

suhas kande

छोटा राजनच्या 'त्या' धमकीला भीकही घालत नाही - आ. कांदे

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : धमक्यांच्या फोनला आपण घाबरत नाही आणि भीकही घालत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार सुहास कांदे (mla suhas kande) यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. नांदगाव मतदारसंघातील सामान्य जनता आपल्या सोबत असून, धमकी देणाऱ्याला आपण जे काही सुनवायचे ते सुनावले आहे. मी मुंबईत जाताना अंगरक्षकदेखील सोबत नेलेला नाही. मात्र, हा सर्व प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या कानावर घातला असून, नाशिक येथील पोलिस आयुक्तांकडे मुंबईत असल्यामुळे लेखी तक्रार अर्ज दिल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार कांदे यांना देण्यात आलेल्या धमकीचा नांदगाव तालुक्यातील शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून स्थानिक सोशल मीडियावर निषेध व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर्स केल्या जात आहेत.

छोटा राजन गॅगची शिवसेना आमदार कांदेना धमकी

विकासकामाच्या आढावा बैठकीत यापूर्वी शिवसेना आमदार सुहास कांदे व छगन भुजबळ यांच्यात वाद रंगला होता. जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री भुजबळ (chhagan bhujbal) यांनी निधीचा विनियोग नीट केलेला नाही. तसेच, दहा कोटींच्या कामांचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप आमदार कांदे यांनी केला आहे. याच संदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीतर्फे आलेल्या निधीच्या असमान वाटपावरुन उच्च न्यायालयात दाखल केलेली रिट याचिका मागे घ्या, अन्यथा तुमचे व कुटुंबियांनी चांगले होणार नाही, अशी धमकी छोटा राजन टोळीकडून देण्यात आल्याचे आमदार सुहास कांदे यांनी म्हटले आहे. नांदगाव मतदार संघाचे आमदार कांदे यांनी याबाबत गंगापूर पोलीस ठाणे व पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. नांदगाव मतदारसंघाच्या ‘डीपीडीसी’च्या निधी वाटपावरून सुरु झालेला सुहास कांदे विरुद्ध छगन भुजबळ वाद वाढतच चालला असताना, छोटा राजन टोळीकडून धमकीचा फोन आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोचवा

मी छोटा राजन यांचा पुतण्या असून.....

मंत्री छगन भुजबळ यांनी दहा कोटींच्या कामांचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप आमदार कांदे यांनी केला आहे. याच संदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबतचे पुरावे त्यांनी न्यायालयात दाखल केले आहे. याच याचिकेसंदर्भात आपल्याला सोमवारी (ता. २७) छोटा राजन टोळीकडून धमकीचा फोन आला असल्याचे कांदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, आमदार कांदे यांना सोमवारी सायंकाळी सहाला ९६६४६६६६७६ या क्रमांकावरुन फोन आला. त्यावरून, मी अक्षय निकाळजे बोलत असल्याचे सांगण्यात आले. कोण निकाळजे, असे विचारले असता, मी छोटा राजन यांचा पुतण्या असून तुम्ही उच्च न्यायालयात दाखल केलेली रिट याचिका काढून घ्या. अन्यथा तुमच्यासाठी व कुटुंबियासाठी चांगले होणार नाही, अशी धमकी दिली. यानंतर फोन कट केला असता थोड्या वेळाने पुन्हा फोन करत दमदाटी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, आमदार कांदे यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्तांना देत, संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याबाबत पत्र दिले आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघातील असमान निधी वाटपाचे प्रकरण आता अधिक चिघळू लागल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: MPSC परीक्षेत रोहन कुवर मागासवर्गीयांमध्ये राज्यात प्रथम

धमकी देणाऱ्यांविरुद्ध करा कारवाई : भुजबळ

महाविकास आघाडीचे आमदार सुहास कांदे यांना धमकी देणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना दिले आहेत. तसेच, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निदर्शनास ही बाब श्री. भुजबळ यांनी आणून दिली. तत्पूर्वी त्यांनी आमदार कांदे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्राची माहिती घेतली. आमदार कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर असून, मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच याबाबत माहिती मिळाली. आपण ही माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले. राज्यात अशाप्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले

loading image
go to top