अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करा सोने खरेदी!

Gold
Gold

सोने खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र लॉकडाउनमुळे सराफा दुकाने बंद असल्याने ग्राहकांना यावर्षी हा मुहूर्त साधता येणार नाही. त्याचबरोबर हा मुहूर्त रविवारी आल्याने शेअर बाजार बंद आहे. परिणामी प्रत्यक्ष सोने खरेदीला पर्याय असणाऱ्या गोल्ड ईटीएफमधील ट्रेडिंग आणि बँका बंद असल्याने ‘ई फॉर्म’चा पर्याय देखील संपुष्टात आला आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्राहकांसाठी ऑनलाइन सोने खरेदीचा पर्याय काही सराफा दुकानदारांनी पुढे आणला आहे.

भावाबाबत ग्राहकांना लाभ
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करता यावे यासाठी पीएनजी ज्वेलर्सतर्फे आकर्षक ऑफर सादर करण्यात आली आहे. त्यानुसार सुवर्ण वेढण्यांसाठी ‘ई-व्हाउचर्स’ आणि ‘प्युअर प्राईस’ ऑफर सादर करण्यात आली आहे. प्युअर प्राईस ऑफर अंतर्गत ग्राहकांना किंमतीवर पूर्णपणे संरक्षण प्रदान करीत लॉकडाउननंतर सोन्याचे भाव वाढला तरी प्रत्यक्ष सोने घेताना मागणी नोंदविलेल्या दिवसाचाच भाव मिळणार आहेत. हा भाव कमी झाला तर कमी भावानुसारच सोने घेता येईल. त्यामुळे ग्राहकांचा लाभ होणार असल्याची माहिती ‘पीएनजी’ ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी दिली.

फोनद्वारे नोंदवा सोन्याची मागणी 
रांका ज्वेलर्सने देखील ग्राहकांना किमतीवर संरक्षण देत ऑनलाइन आणि फोनद्वारे सोन्याची मागणी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ग्राहकांना २४ कॅरेट शुद्ध सोने १० ग्रॅमला ४५ हजार ५०० रुपयांनुसार खरेदी करता येणार आहे. तसेच लॉकडाउन संपल्यानंतर ग्राहकांना वेढणी किंवा दागिने स्वरूपात प्रत्यक्ष सोने घेता येणार असल्याचे रांका ज्वेलर्सच्या फत्तेचंद रांका यांनी म्हटले.

‘डिजिटल गोल्ड’चा पर्याय
मेटल्स अँड मिनरल ट्रेडिंग कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया आणि स्वित्झर्लंडचा सराफा ब्रँड ‘पीएएमपी एसए’ यांच्या वतीने व्यवस्थापन होत असलेल्या ‘डिजिटल गोल्ड’ खरेदी करण्याचा पर्याय पेटीएम, गूगल पे, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माध्यमातून उपलब्ध आहे. त्यानुसार किमान १०० ते ५०० रुपयांपासून सोने खरेदी करता येते. तसेच अटी आणि शर्थीची पूर्तता करून खरेदी केलेल्या सोन्याची प्रत्यक्ष डिलिव्हरी देखील घेता येते.

‘गोल्डरश’ खात्यामधूनही खरेदी
भारतातील सर्वात मोठी स्टॉक कस्टोडियन आणि डिपॉझिटरी असलेल्या ‘स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या (एसएचसीआयएल) संकेतस्थळावर जाऊन ‘गोल्डरश’ खाते सुरु करून किमान १०० रुपये किंवा १०० रुपयांच्या पटीत ऑनलाइन सोने खरेदी करता येऊ शकेल. तसेच अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने मिळणाऱ्या खास सवलतींचा लाभ देखील ग्राहकांना घेता येणार आहे.

सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर
अनिश्चिततेच्या काळात आर्थिक पातळीवर होणारे नुकसान कमी करण्यासाठी म्हणून सोन्यातील गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरते. यावेळी देखील कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्था ठप्प झालेली असताना सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. विकसित देश कोरोनामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक वाढवतील तसेच विकसनशील देशांच्या चलनात घसरण झाल्याने सोन्याच्या किमतीत वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओत गोल्ड ईटीएफमधील गुंतणवूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

एका वर्षात सोने ५२ हजारांवर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढत आहेत तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण होत असल्याने एक वर्षाच्या कालावधीमध्ये सोन्याच्या भावात १३ ते १४ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून पुढील अक्षय्य तृतीयेपर्यंत सोने ५२ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे प्रसिद्ध कमॉडिटी तज्ज्ञ अमित मोडक यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात वर्ष अखेरीपर्यंत सोन्याचा भाव ऐतिहासिक १९२० डॉलर प्रति औंसचा टप्पा पार करेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

मागील वर्षभरात सोन्याचा भाव तब्बल ४३ टक्क्यांनी वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोन्यामधील वाढ कायम राहण्याची चिन्हे असून आज ४६०० रुपये प्रति ग्रॅम भाव असलेले सोने वर्षअखेरीपर्यंत प्रति ग्रॅम पाच हजार रुपयांवर जाऊ शकते.
- शेखर भंडारी, वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख, ग्लोबल ट्रान्झॅक्शन बँकिंग अँड प्रेशिअस मेटल्स कोटक महिंद्रा बँक

राजकीय, आर्थिक अनिश्चितते दरम्यान किंवा कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीत सोने एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक म्हणून ओळखले जाते. सोने चलनवाढीविरूद्ध बचाव म्हणून काम करते त्यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
- नीश भट्ट, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मिलवूड केन इंटरनॅशनल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com