साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. अक्षयकुमार काळे

AkshayKumar_Kale
AkshayKumar_Kale

नागपूर - डोंबिवली येथे होणाऱ्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी विजय मिळविला. प्रसिद्ध गीतकार- कवी प्रवीण दवणे यांचा 550 मतांनी पराभव करून त्यांनी हा मान पटकावला. जवळपास अडीच तासांच्या मतमोजणी प्रक्रियेनंतर निवडणूक अधिकारी ऍड. मकरंद अग्निहोत्री यांनी निकाल घोषित केला. यानिमित्ताने संमेलनाध्यक्ष निवडणुकीत सलग दुसऱ्या वर्षी समीक्षकाने कवीवर मात केली आहे.


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या विदर्भवारीत सलग दुसऱ्यांदा विदर्भाच्या साहित्यिकाने संमेलनाध्यक्ष होण्याचा मान पटकावला आहे. यापूर्वी 2007 मध्ये महामंडळ विदर्भाकडे होते आणि त्या वेळी डॉ. अरुण साधू यांनी ही निवडणूक जिंकली होती. यंदा डॉ. काळेंच्या निमित्ताने नऊ वर्षांनंतर याची पुनरावृत्ती झाली. विशेष म्हणजे दोघेही अमरावती जिल्ह्याचेच आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉ. काळे यांचे अभिनंदन केले. यंदाच्या निवडणुकीत डॉ. काळे यांच्यापुढे प्रवीण दवणे यांचे आव्हान असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. या दोघांमध्येच खरी लढत असल्याचेही चित्र निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्ष निकालात डॉ. काळे यांच्या बाजूने कौल लागला. प्रवीण दवणे यांची लोकप्रियता लक्षात घेता, काहींना या निकालाचे आश्‍चर्य वाटणे स्वाभाविक आहे; परंतु डॉ. अक्षयकुमार काळे यांनी गेल्या वर्षभरात आणि विशेषत्वाने गेल्या दोन महिन्यांत केलेली तयारी त्यांच्याच बाजूने निकाल वळविणार हे स्पष्ट होते. तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ज्येष्ठ समीक्षक डॉ. मदन कुलकर्णी हेदेखील नागपूरचेच. डॉ. काळे यांना "काउंटर' प्रतिस्पर्धी म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले, हे साहित्यवर्तुळाला ठाऊक होते, तरीही सुरवातीपासून त्यांचे नाव तिसऱ्याच क्रमांकावर होते. चौथे उमेदवार डॉ. जयप्रकाश घुमटकर यांना शाई प्रकरणाने फारशी साथ दिली नाही. अवघ्या तीन मतांवर त्यांना समाधान मानावे लागले.

साहित्य संमेलनाची उद्दिष्टे लक्षात घेता अध्यक्षपदासाठी विशिष्ट गुणवत्ता असावी लागते, ती गुणवत्ता माझ्यात आहे, हे मतदारांपर्यंत पोचविण्यात मी यशस्वी ठरलो.
- डॉ. अक्षयकुमार काळे, नियोजित संमेलनाध्यक्ष

असे झाले मतदान...
एकूण मतदार : 1,071
एकूण मतदान : 914
अवैध मते : 50

मिळालेली मते
डॉ. अक्षयकुमार काळे : 692
प्रवीण दवणे : 142
डॉ. मदन कुलकर्णी : 27
डॉ. जयप्रकाश घुमटकर : 03

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com