असो कैक अडथळे; पाहू रूप सावळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alandi to Pandharpur and Dehu to Pandharpur Palkhi National Highways work warkari will meet pandurang

असो कैक अडथळे; पाहू रूप सावळे

पुणे : आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर पालखी राष्ट्रीय महामार्गांची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. दोन्ही महामार्ग आगामी दोन वर्षांत ‘राजमार्ग’ होणार आहेत. मात्र, यंदा तरी आषाढी वारीत वैष्णवांच्या मांदियाळीला कधी प्रशस्त डांबरी, तर कधी माती-खडीमय रस्ता, कधी उड्डाणपुलांची सफर तर कधी चिंचोळ्या रस्त्याने वाटचाल करावी लागणार आहे. दोन वर्षे वारीच्या विरहाने व्याकूळ झालेले वारकरी या मार्गावरील समस्यांवर मात करून सावळ्या विठुरायाच्या भेटीचा आनंदवारीचा सोहळा अनुभवतील.

सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत पालखीमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे यंदा तरी दोन्ही मुक्कामांच्या ठिकाणांमध्ये दिंड्यांतील वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. पालखीमार्गावर सध्या रस्ते खोदाईमुळे सेवा रस्ते चिंचोळे झाले आहेत. त्यामुळे सेवा रस्त्याची रुंदी वारीपुरती वाढवावी लागणार आहे. मुख्य रस्ता रुंदीकरणासाठी खोदल्याने, तसेच उड्डाणपुलाच्या कामांमुळे सोहळ्याला ‘प्लिज डायव्हर्जन’ या सूचनेला वेळोवेळी सामोरे जावे लागणार आहे. पंढरपूर तालुका हद्दीवर उड्डाणपूल झाल्याने टप्प्याजवळ होणारा संत ज्ञानेश्वर महाराज आणि सोपानदेव महाराज बंधुभेटीचा सोहळा माळशिरस तालुक्यात सावंतवाडी बसथांब्याजवळ करावा लागणार आहे, तसेच काही रिंगणाच्या जागाही कमी झाल्या आहेत, त्याही वाढवाव्यात लागणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात रुंदीकरणामुळे दिंड्यांच्या वाहनांसाठी काही ठिकाणी रस्ता दुभाजक करावे लागणार आहेत, तसेच वारीत पाऊस राहिल्यास खोदलेल्या रस्त्यावरील चिखलातून वाट काढताना आणि दिंड्यांची वाहने काढताना वारकऱ्यांना ‘सत्त्वपरीक्षा’ द्यावी लागणार आहे.

आळंदी ते पुणे

 • धाकट्या पादुकापर्यंत अरुंद रस्ता

 • चऱ्होली ते दिघी दरम्यान प्रशस्त रस्ता

 • दिघी ते म्हस्के वस्ती कॅम्प अरुंद रस्ता

पुणे ते सासवड

 • हडपसरमधील पुलाजवळील रस्त्याची कोंडी सोडवावी लागणार

 • दिवे घाटात काही ठिकाणचे धोकादायक खडक पाडावे लागणार

 • दिवे घाट ते सासवड रस्त्याची स्थिती चांगली

वाल्हे ते लोणंद

 • वाल्हे ते नीरा रस्ता अरुंद

 • रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे

 • नीरा ते लोणंद रस्ता रुंद

लोणंद ते तरडगाव

 • लोणंद पूल ते कापडगाव अरुंद रस्ता

 • चांदोबाच्या लिंबजवळ रुंदीकरण कामामुळे रस्ता उंच सखल

 • रस्त्याचा भाग भरून घेण्याची गरज

तरडगाव ते फलटण

 • रुंदीकरणामुळे रस्ता उंच-सखल

 • सुरवडीत विसाव्याला जाण्यासाठी मार्ग करावा लागणार

 • सुरवडीजवळ रस्ता मोठ्या प्रमाणात खोदल्याने अडचण

फलटण ते बरड

 • पुलाचे काम सुरू असल्याने सेवा रस्त्यालगचा खड्डा धोकादायक

 • रस्ता रुंदीकरणामुळे रस्ता उंच-सखल

 • पहिल्या टप्प्यातील रस्ता रुंद

वेळापूर ते भंडीशेगाव

 • उड्डाणपुलामुळे सेवा रस्त्याचा वापर करावा लागणार

 • बहुतांश रस्ता रुंद झाल्याने वाटचालीस सुकर

 • टप्प्याजवळ उड्डाणपूल झाल्याने बंधुभेटीचे ठिकाण बदलणार

माळशिरस ते वेळापूर

 • रुंदीकरणामुळे रस्ता उंच-सखल

 • अनेक ठिकाणी रस्ता चिंचोळा

 • शेवटच्या टप्प्यातील रस्ता रुंद

वाखरी ते पंढरपूर

 • दूध पंढरीजवळ रस्त्यावर खड्डे

 • पूर्ण रस्त्याची साइडपट्ट्या भरण्याची गरज

 • वाखरी तळ स्वच्छतेची गरज

भंडीशेगाव ते वाखरी

 • रिंगणाच्या ठिकाणाजवळ उड्डाणपूल

 • रुंद झालेल्या रस्त्यावर दुभाजकांची गरज

 • वाखरीजवळ एक किलोमीटर रस्ता खराब

नातेपुते ते माळशिरस

 • रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे; मांडवी ओढ्याजवळ पुलाचे काम

 • मांडवी ते सदाशिवनगर रस्त्याची अवस्था बिकट

 • उड्डाणपुलामुळे चिंचोळे रस्ते

बरड ते नातेपुते

 • धर्मपुरीजवळ पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता चिंचोळा

 • रुंदीकरणामुळे रस्ता उंच, सख; साइडपट्ट्या भरण्याची गरज

 • शिखर शिंगणापूर फाट्यावर रस्ता रुंदीकरण सुरू

सासवड ते जेजुरी

 • कऱ्हा नदीवरील पूल अपूर्ण; सासवड-जेजुरी बाह्यवळण मार्ग सुधारण्याची गरज

 • बोरावके मळा ते जेजुरी दरम्यान साइडपट्ट्या भरण्याची गरज

 • पुलांची कामे अपूर्ण असल्याने वाहनांची कोंडी होण्याची शक्यता

जेजुरी ते वाल्हे

 • जेजुरी ते एमआयडीसी दरम्यान रस्त्याकडेला काटेरी झुडपे

 • दौंडज खिंड ते वाल्हा रस्ता अपुरा

 • साइडपट्ट्या भरण्याची गरज

पालखीमार्गाचे रुंदीकरण वेगाने सुरू आहे. कोरोनामुळे ते काही काळ रखडले होते. सोलापूर जिल्ह्यातील रुंदीकरण दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. यंदाच्या वारीच्या सोहळ्यात वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही. देवस्थान कमिटीने पाहणी करून काही पर्याय सुचविले आहेत. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

- केशव घोडके, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग सोलापूर

देवस्थानच्या वतीने पालखीमार्गाची पाहणी करण्यात आली आहे. रुंदीकरणामध्ये असलेल्या त्रुटी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्या असून, त्याची वारीपूर्वी पूर्तता करण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.

- ॲड. विकास ढगे, सोहळाप्रमुख, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान

Web Title: Alandi To Pandharpur And Dehu To Pandharpur Palkhi National Highways Work Warkari Will Meet Pandurang

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..