रायगड किल्ला संवर्धनासाठीच्या आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

'किल्ल्याच्या संवर्धनासाठी 59 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या कामावर लक्ष ठेवण्यासाठी महाड येथे स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले आहे. तेथे चार कार्यकारी अभियंता, चार उपविभागीय अभियंता यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या आराखड्यांतील कामांच्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत. पावसाळा संपताच या कामांना सुरुवात होईल.'
- पी. डी. मलिकनेर
(जिल्हाधिकारी- रायगड)

606 कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी 59 कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त

अलिबागः रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 606 कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, यापैकी 59 कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. आराखड्यांतील कामांची अंदाजपत्रकं तयार करण्यात आली असून, निवदाप्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या कामांना सुरवात होणार आहे.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व पुरातत्व विभागातर्फे  ही कामे करण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र पथक यासाठी तांत्रिक साह्य करणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या 59 कोटी रूपयांमधून भूसंपादनाच्या कामासाठी 10 कोटी रूपये, किल्ल्यावरील पायवाटा व इतर कामांसाठी 9 कोटी, तर किल्ला दुरूस्ती व पर्यटन सुविधांसाठी 40 कोटी रूपये खर्ची पडणार आहेत. विशेष बाब म्हणजे या आराखड्यांतर्गत पाचड येथे 100 एकर जमीन संपादीत करण्यात येणार असून, स्थानिक ग्रामपंचायतीने यासाठी सहकार्य करण्याची तयारीही दर्शविली आहे. संपादीत केलेल्या जागेवर शिवसृष्टी आणि वाहनतळ उभारण्यात येणार आहे. महाड ते पाचाड हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर करण्यात आला असून, हा रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे. या कामाचे भुमिपुजन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते करण्यात आले. हे काम सप्टेंबर महिन्यात सुरु होणे अपेक्षित आहे.        

आराखड्यातील कामे
किल्ल्यांचा इतिहास जिवंत करुन दाखविण्यासाठी शिवसृष्टी तयार करणे, रायगड किल्ल्यावर प्राचिन वास्तूंचे संवर्धन, शास्त्रयुक्त पद्धतीने डेब्रिज काढणे व उत्खननातील प्राचीन इमारतीचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, रायगड किल्ल्यावरील सर्व वस्तूंचे डॉक्युमेन्टेशन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे.

गडावर करण्यात येणारी कामे
रायगड किल्यावरील चित्त दरवाजा, नाना दरवाजा, खुबल्दा बुर्ज, महादरवाजा आदींचे संवर्धन व जिर्णोद्धार करणे, तसेच पर्यटक व शिवप्रेमींना रायगडावर पोहचण्यासाठी मजबूत पायवाटा निर्माण करणे, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी महत्वाच्या सोयी उपलब्ध करून देणे, जलसंवर्धन करणे याबाबींचा समावेश आहे. याशिवाय पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधी व जिजामाता वाडा यांच्या संवर्धन व जिर्णोद्धाराचे कार्य तसेच याठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alibaug news State Government sanctioned for conservation of Raigad Fort