शिंदेंचे बंड भाजपचे षडयंत्र; आमदार नितीन देशमुख यांचा आरोप

मुंबईवरून सुरत व तेथून गुवाहाटीपर्यंत शिंदे यांच्यासोबत असलेले नितीन देशमुख बुधवारी रात्री अकोल्यात परतले.
Allegations of Nitin Deshmukh on Eknath shinde bjp council elections akola
Allegations of Nitin Deshmukh on Eknath shinde bjp council elections akolasakal

अकोला : सुरत ते गुवाहाटीपर्यंतच्या प्रवासात भाजपच्या पदाधिकारी व आमदारांची उपस्थिती लक्षात घेता शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते, मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड हे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेनेचे बाळापूर येथील आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. मुंबईवरून सुरत व तेथून गुवाहाटीपर्यंत शिंदे यांच्यासोबत असलेले नितीन देशमुख बुधवारी रात्री अकोल्यात परतले. त्यांनी त्यांच्यासोबत झालेली आपबिती माध्यमांसोबत कथन केली. देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर मतदान केल्याबरोबर गटनेते शिंदे यांनी गाडीत बसवून नेल्याचे सांगितले.

ते पुढे म्हणाले, सुरतमध्ये पोहोचल्यानंतर मी हॉटेलमधून बाहेर पडलो. जैन विद्यालयापर्यंत आलो. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माझ्या स्वीय सहाय्यकाला जागेची छायाचित्रे पाठवून सुटका करण्याची विनंती केली. त्याचवेळी माझ्या मागावर असलेल्या ३०-४० पोलिसांनी मला बळजबरीने उचलून रुग्णालयात नेले. मला हृदयविकाराचा धक्का बसला असल्याचे सांगून माझा घातपात करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मला पुन्हा हॉटेलला सोडले. त्यानंतर मी मवाळ होऊन शिंदे यांच्यासोबत राहिलो व गुवाहाटीपर्यंत पोहोचलो. तेथून गनिमी काव्याने मी माझी सुटका करून घेतली. सुरतमधील प्रशासन व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा माझा घातपात करण्याचा प्रयत्न होता, असा आरोपही आमदार देशमुख यांनी केला.

नाव शिंदेंचे, कटकारस्थान भाजपचे

गुवाहाटी येथे पोहोचलो तेव्हा तेथे भाजपचे आमदार संजय कुटे व आमदार चव्हाण यांच्यासोबत भाजपचे इतरही पदाधिकारी तेथे असल्याने यावरून या बंडामागे शिंदे यांचे नाव दिसत असले तरी संपूर्ण कटकारस्थान भाजपचे असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला.

स्वाक्षरी माझी नाही

एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या उपसभापतींनी सादर केलेल्या आमदारांच्या स्वाक्षरीच्या यादीत माझे नाव असले तरी ती स्वाक्षरी मी केली नसल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे. मी इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करतो तर यादीमध्ये माझ्या नावापुढे मराठीत स्वाक्षरी करण्यात आली आली, असेही देशमुख म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com