Vidhan Sabha 2019 : फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिला नाही: शहा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून, महाराष्ट्राचा दबदबा वाढला आहे. फडणवीस यांनी विकासाची कामे केली आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सांगलीची प्रगती झाली.

जत : महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी काय केले हे सांगावे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे घराणेशाहीत अडकले. पण, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रला स्थिर सरकार दिले आहे. दिवस-रात्र काम करणाऱ्या फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते सतत फोन करत असतात, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त, चाराछावण्यांचा भाग अशी ओळख असलेल्या जतमध्ये अमित शहा यांच्या आज (गुरुवार) झालेल्या सभेत काश्मीरमधून हटविण्यात आलेल्या कलम 370 चाच डंका होता. कलम 370 हटविल्यानंतर देश एकसंध झाल्याचेही त्यांनी सांगितले.

जतमध्ये आज भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी शहा यांची सभा झाली. महाराष्ट्रात आज त्यांच्या चार सभा होत आहेत. सगळ्यांना माझा नमस्कार असे मराठीत सांगत अमित शहा यांनी भाषणाची सुरवात केली. शहा म्हणाले, की कलम 370 ला शरद पवार यांचा पाठिंबा आहे की नाही हे सांगावे. 5 ऑगस्टला काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर अद्याप एकही गोळी चालविण्यात आलेली नाही. काश्मीरमधील जनता शांतता अनुभवत आहे. कलम 370 हटविल्यानंतर देश एकसंध झाला आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर कलम 370 हटविण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता भारतमातेचे तुकडे करणाऱ्यांना जेलवारी होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचा कलम 370 हटविण्यास विरोध आहे. पाकच्या हल्ल्याचा बदला आपल्या सैन्याने घेतला. देशाला सुरक्षित करण्याचे काम मोदींनी केले आहे. मोदी हे देशातील लोकप्रिय पंतप्रधान आहेत. 

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून, महाराष्ट्राचा दबदबा वाढला आहे. फडणवीस यांनी विकासाची कामे केली आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सांगलीची प्रगती झाली, असेही शहा यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah appreciate CM Devendra Fadnavis work in Maharashtra