
Amit Shah in Maharashtra : "संभाव्य निकाल त्यांनी हेरला"; शाहांचं कौतुक करत रोहित पवारांचा पुणेरी टोला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पुण्यातही आले आहेत. आता त्यांच्या पुणे भेटीवरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणतात, "अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनितिकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह साहेब. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजपविरोधातील असंतोष आणि संभाव्य 'निकाल' त्यांनीही हेरला असावा!"
अमित शाह पुण्यात आले असता त्यांनी मोदी @20 या पुस्तकाच्या मराठी अनुवादित आवृत्तीच्या प्रकाशनाला हजेरी लावली. त्यानंतर भाजपा खासदार गिरीश बापट यांची भेटही त्यांनी घेतली. त्यांच्या चौकशीची विचारपूस केली. पण कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांसाठीच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला नाही.