सेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे कोण विसरणार..? (व्हिडिओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

युतीची चर्चा केवळ माध्यमांत असून, अद्याप युतीबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. युतीचा निर्णय सर्वस्वी उद्धव ठाकरेच घेतील. मात्र, लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका झाल्यास शिवसेना सक्षमपणे लढण्यास तयार आहे. 
- संजय राऊत, 31 जानेवारी 2019 

स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही शिवसेनेने कायम विरोधी पक्षाची भूमिका निभावली. सामनातून शिवसेनेने जोरदार प्रहार केलेत. तर भाजपनेही शिवसेनेकडे अखेर दुर्लक्ष केलं. अशा वातावरणात महाराष्ट्रात चौरंगी लढत होणार अशी शक्यता असताना अखेर भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. 

हातमिळवणीपूर्वीचे बोचकारे आणि फटकारे 
आजवर आमची मैत्री पाहिली, मात्र वाघाचा पंजा नाही पाहिला. 
- उद्धव ठाकरे, 30 ऑक्‍टोबर 2015 

वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजती दात, आमची जात.. आम्हाला पंजा दाखवू नका. 
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 30 ऑक्‍टोबर 2015 

मी भाजपबरोबर युती करणार नाही. आतापासून लढाईस सुरवात झाली आहे. शिवसेनेच्या 50 वर्षांच्या इतिहासामध्ये या युतीमुळे 25 वर्षे वाया गेली. आम्ही सत्तेचे भुकेले नाही. आता या पुढे शिवसेना एकहाती महाराष्ट्रामध्ये भगवा फडकावेल. शिवसेना आता युतीसाठी कोणाचा दरवाजा ठोठावणार नाही. 
- उद्धव ठाकरे, 26 जानेवारी 2017 

आता मैत्रीपूर्ण सामने होणार नाहीत. युतीचे राजकारण बास्स झाले. यापुढे जे काही राजकारण असेल ते एकट्याच्या शिवसेनेच्या ताकदीचे असेल. 
- उद्धव ठाकरे, 5 फेब्रुवारी 2017 

सावजाची शिकार मीच करेन. त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही. पण, आता सावजच दमलंय, त्याला मारण्यासाठी बंदुकीचीही गरज नाही. 
- उद्धव ठाकरे, 24 जुलै 2018 

स्वबळावर लढणे हा गुन्हा नाही. शिवसेनाप्रमुख हयात असताना प्रमोद महाजन यांनी शतप्रतिशत भाजपची घोषणा केली होती. आता समोर मोदी असोत वा आणखी कोणी; विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविणारच. शिवसेना यापुढे प्रत्येक राज्यात निवडणूक लढणार आहे. आतापर्यंत हिंदुत्ववादी मतांमध्ये विभाजन होऊ नये, म्हणून आम्ही लढत नव्हतो. पण, आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्हालाच लढावे लागेल. 
- उद्धव ठाकरे, 24 जानेवारी 2018 

या सरकारने जनतेला फसविल्याने इथून पुढे भाजपशी युती करणार नाही व स्वतंत्रपणे निवडणूक लढून संपूर्ण महाराष्ट्र भगवा करणार. 
- उद्धव ठाकरे, 28 फेब्रुवारी 2018 

यापुढे शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. भाजपचे नेते काहीही म्हणू द्या, शिवसेनेसाठी युतीचा अध्याय संपला आहे. यापुढे भाजपशी युती नाही म्हणजे नाहीच. स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला आहे. या निर्णयानंतर भाजपशी युती करण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही. 
- उद्धव ठाकरे, 11 मे 2018 

आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत. 
- परिवहन मंत्री दिवाकर रावते, 8 ऑगस्ट 2018 

खानाच्या फौजांचा पद्धतशीर सामना करू. 
- उद्धव ठाकरे, 18 ऑक्‍टोबर 2018 दसरा मेळावा 

शिवसेनेचे प्रेम छुपे आहे, तर आमचे उघड आहे. कुणी कितीही नाकारले, तरी भाजप आणि शिवसेनेची युती होणारच. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, 11 नोव्हेंबर 2018 

शिवसेना पोकळ धमक्‍या आणि पादऱ्या पावट्याच्या इशाऱ्याला घाबरत नाही. 
-संजय राऊत, 7 जानेवारी 2019 

युतीची चर्चा केवळ माध्यमांत असून, अद्याप युतीबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. युतीचा निर्णय सर्वस्वी उद्धव ठाकरेच घेतील. मात्र, लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका झाल्यास शिवसेना सक्षमपणे लढण्यास तयार आहे. 
- संजय राऊत, 31 जानेवारी 2019 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहावे. युती होईल की नाही, या द्विधा मनस्थितीत राहू नये. युती झाली तर ठीक; नाहीतर शिवसेनेला आपटून टाकू (पटक देंगे). 
- अमित शहा, भाजप अध्यक्ष, 6 जानेवारी 2019 

भाजप आणि शिवसेनेचे लोकसभेसाठी मनोमिलन झाले. भाजप 25 आणि शिवसेना 23 जागांवर लोकसभेसाठी लढणार हे स्पष्ट. 
- अमित शहा, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, 18 फेब्रुवारी 2019


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah meets Uddhav Thackeray finalise BJP-Sena seat-sharing deal