Video : औरंगजेबाला जे जमलं नाही, ते या सरकारनं करून दाखविलं! : अमाेल काेल्हे

मिलिंद संगई
Friday, 6 September 2019

राज्यातील जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेल्या 25 किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल व डेस्टीनेश वेडींगचा निर्णय घेणा-या राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. 

बारामती शहर : राज्यातील जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेल्या 25 किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल व डेस्टीनेश वेडींगचा निर्णय घेणा-या राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. 

दरम्यान, फेसबुकवर त्यांनी एक व्हिडीओ प्रसारित करुन सरकारच्या या धोरणावर आसूड ओढले. संतापजनक व निषेधार्ह असा निर्णय अशा शब्दात या निर्णयाचा कोल्हे यांनी निषेध केला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी यातील एकेक किल्ला, एकेक दरवाजा एकेक बुरुज राखण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले, त्या बलिदानाचा अपमान करण्याचा कोणताही अधिकार सरकारला नाही.

छत्रपतींचे किल्ले देणार लग्नासाठी; सरकारचा संतापजनक निर्णय

मिर्झाराजे जयसिंगासोबत जेव्हा राजांनी तह केला तेव्हाही जेमतेम वीस किल्ले देऊ केले होते. औरंगजेबाला त्याच्या हयातीत एकही किल्ला जिंकता आला नव्हता, मात्र दुर्देवाने म्हणावे लागेल की, औरंगजेबाला त्याच्या हयातीत जमलं नाही ते सरकारने पाच वर्षात हा निर्णय घेऊन करुन दाखविले आहे. 

ज्या राजस्थानच्या किल्ल्यांचा या निर्णयात उल्लेख केला आहे, ते निवासी किल्ले होते, महाराष्ट्रातील किल्ले हे युध्द किल्ले आहेत. हा फरक समजून घ्यायला हवा. वारंवार डेस्टीनेशन वेडींग असा जो उल्लेख केला जातो, तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊच दिला जाणार नाही आणि जरी केला तरी येथे डेस्टीनेशन वेडींगसाठी नेमके कोण येणार आहे, जी उच्चभ्रू मंडळी येथे डेस्टीनेशन वेडींग करतील त्या पैकी किती जणांना आपल्या जाज्वल्य इतिहासाबाबत चाड आणि भान असणार आहे याचा सरकारनेही विचार करायला हवा. 

गडकिल्ल्यांना हात लावाल तर याद राखा : धनंजय मुंडे

दरम्यान, ज्या मातीवर मावळ्यांनी बलिदान पत्करले होते, तेथे डेस्टीनेशन वेडींगचे सोहळे रंगणार असतील तर सरकारने नक्की याचा पुन्हा विचार करायला हवा. विकासाला विरोध नाही, येथे संग्रहालय शिवसृष्टी उभारायला विरोध नाही, पण डेस्टीनेशन वेडींगसाठी ऐतिहासिक किल्ल्यांचा उपयोग होता कामा नये, असे अमोल कोल्हे यांनी नमूद केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amol kolhe criticize bjp government forts into heritage hotels wedding venues issue