अमृता फडणवीसांच्या 'Dicey Creature'ला रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर; ट्विटरवर वाद रंगला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

अमृता फडणवीस यांच्या ट्विटला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही उपरोधिक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या येनकेन कारणाने सातत्याने चर्चेत असतात. आपल्या ट्विटरवर त्या अनेकदा राजकीय घडामोडींबाबत भाष्य करत असतात. बरेचदा त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीकास्त्रही सोडत असतात. अमृता फडणवीस यांच्या या टीकेवर चर्चा, वाद-प्रतिवादही घडत असतात. आता त्यांचे असेच एक ट्विट सध्या चर्चेत आहे. राज्यातील बार सुरु असताना मंदिरे सुरु करायला काय अडचण आहे असा सवाल करणारे हे ट्विट आहे. या ट्विटला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही उपरोधिक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. 

हेही वाचा - "ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का?" अमृता फडणवीसांना ठाकरी भाषेत तिखट उत्तर

अमृता फडणवीस यांनी इंग्रजीत ट्विट केलंय की, वाह रे प्रशासन, राज्यातील बार आणि दारुची दुकाने उघडी आहेत मात्र फक्त मंदिरेच डेंजर झोनमध्ये आहेत का? निश्चितपणे काहीवेळा नियम करणाऱ्यास असमर्थ असणाऱ्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते. 

अमृता फडणवीस यांच्या या टीकेच्या समाचार रुपाली चाकणकर यांनी आपल्या उपरोधिक शैलीत घेतला आहे. त्यांनी म्हटलंय की, 
राघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या 'Dicey Creature' ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही. त्यामुळे आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा.

 

हेही वाचा - दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका; कोडिंग अनिवार्य नाहीच

सध्या या वाद-प्रतिवादाची चांगलीच चर्चा होत आहे. राज्यात मंदिरे उघडण्यासंदर्भातली चर्चा अद्याप ताजी आहे. काल भाजपने यासंदर्भात ठिकठिकाणी आंदोलनही केले होते. यावरुनच काल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री यांच्यात पत्राद्वारे शेरेबाजीही झाली होती. राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीची दखल घ्यावी असं सांगणाऱ्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी योग्य ती खबरदारी घेऊनच मंदिरे उघडू असं कळवलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AMRUTA FADNAVIS tweet NCP Woman President Rupali Chakankar retaliate