

मोठे क्रिकेट मैदान!
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १५ एकरावर भव्य क्रिकेट मैदान साकारले जाणार आहे. विद्यापीठ ३८२ एकरातील इनडोअर स्टेडिअमजवळच ते मैदान असणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि विद्यापीठात करार झाला आहे. त्यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे सुरवातीला दीड कोटींचा निधी मागितला आहे. तो निधी प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाच्या जागेत मैदान तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात क्रिकेटची आवड असणारे तरुण, लहान मुले खूप आहेत. सध्या शहर-जिल्ह्यातील १० हजारांहून अधिकजण सध्या क्रिकेटच्या सरावातून आयपीएल, रणजी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. सोलापूर शहरात इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम आहे, पण त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय किंवा आयपीएल सामने व्हायला मर्यादा आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या जागेत स्वतंत्र मैदान तयार करून स्टेडिअम उभारले जाणार आहे. साधारणतः: एक ते दीड वर्षात मैदान तयार होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.
इनडोअर स्टेडिअमचे काम पूर्ण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ‘खेलो इंडिया’अंतर्गत मिळालेल्या निधीतून भव्य असे इनडोअर गेम्सचे स्टेडिअम उभारले आहे. ३८२ एकरातील नव्या प्रशासकीय इमारतीजवळ हे स्टेडिअम आहे. त्यासाठी १४ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते त्या स्टेडिअमच्या लोकार्पणाचे नियोजन आहे. याशिवाय त्याठिकाणी साकारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाचेही लोकार्पण त्यावेळी होणार आहे.
वर्षात होईल मैदान, पॅव्हेलियन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ३८२ एकरातील २५ ते ३० एकर जागेसंदर्भात विद्यापीठासोबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार आठ-दहा दिवसांत जागेची मोजणी होऊन त्या जागेचा ताबा घेतला जाईल. त्याठिकाणी एक वर्षात मैदान व छोटे पॅव्हेलियन उभारले जाणार आहे.
- चंद्रकांत रेंम्बर्सु, सरचिटणीस, डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.