Rutuja Latke विजयाच्या उंबरठ्यावर असतानाच मनसेच्या बड्या नेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant More

Rutuja Latke विजयाच्या उंबरठ्यावर असतानाच मनसेच्या बड्या नेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत!

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी सुरु आहे. काही कालावधीतच या निवडणूकीचा निकाल जाहिर होईल. 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाच्या नेत्या ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित समजला जात आहे. दरम्यान, मनसेचे पुण्यातील स्थानिक नेते वसंत मोरे यांच्या एका पोस्टची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे. (Andheri East Bypoll Result Rutuja Latke Get Higest Votes Nota mns Vasant More Facebook post)

मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार...अंधेरीच्या मतदानात नोटांचा पाऊस लोकशाही प्रधान देशात अवघड आहे. अशा आशयाची पोस्ट वसंत मोरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊट्सवर शेअर केली आहे. त्यांच्या या अशा पोस्टमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 32 टक्के मतदान झालं आहे. अंधेरीतल्या गुंदवली महापालिका शाळेमध्ये या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. ऋतुजा लटके या 6व्या फेरीमध्ये 21090 मत घेऊन आघाडीवर आहेत.

भाजपच्या मुरजी पटेल यांनी निवडणुकीपूर्वीच माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र,मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून 'नोटा'चा प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून (ठाकरे गट) करण्यात आला होता. ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते.

सोशल मीडियावर नोटाला ऋतुजा लटके यांच्यापेक्षा जास्त म्हणजे तब्बल ४३००० मतं पडतील, अशी एक पोस्ट व्हायरल झाली होती. मात्र, ही पोस्ट बनावट असल्याचा दावा ठाकरे गटाने केला होता. या पोस्टमधील दाव्याप्रमाणे नोटाला ऋतुजा लटके यांच्यापेक्षा जास्त मतं पडली नसली तरी आतापर्यंत नोटाला ३००० मतं मिळाली आहेत.