दोन महिन्याच्या थकीत वेतनामुळे एसटी कामगारांमध्ये संताप, ST कामगार संघंटना आक्रमक 

प्रशांत कांबळे
Wednesday, 14 October 2020

एसटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसून, अद्यापही दोन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने, ऐन सणासुदीच्या काळात वेतनाच्या मागणीसाठी एसटी कामगार आणि त्यांचे कुटूंब रस्त्यांवर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे राज्य एसटी कामगार संघंटनेने सांगितले आहे. 

मुंबई: कोरोनाच्या महामारीमुळे एसटी आर्थिक संकटात सापडली, त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना वेतन करण्यासाठी सुद्धा पैसे नाही. अशा परिस्थितीत खासगी बँकांकडून कर्ज घेण्याची एसटी महामंडळ वेळ आली आहे. मात्र, एसटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसून, अद्यापही दोन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने, ऐन सणासुदीच्या काळात वेतनाच्या मागणीसाठी एसटी कामगार आणि त्यांचे कुटूंब रस्त्यांवर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे राज्य एसटी कामगार संघंटनेने सांगितले आहे. 

राज्य सरकारने विविध सवलत योजनेच्या प्रतिपूर्तीच्या रूपात आतापर्यंत महामंडळाला सुमारे 750 कोटी रूपये दिले आहे. त्यातून आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन केले. मात्र, अद्याप एसटी कामगारांचे दोन महिन्याचे वेतन आणि विविध भत्ते आणि दसरा, दिवाळीचे अग्रीम मिळाले नसल्याने, एसटी कामगारांवर कुटूंबाचा उदरनिर्वाह करने कठीण झाले आहे. 

मुंबई विभागातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, एसटी कामगार संघंटना सुद्धा आक्रमक झाल्या आहे. राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने नुकतेच राज्यभर आत्मक्लेश आंदोलने केले असून, गेल्या दोन महिन्यांच्या थकीत वेतनासह दसरा, दिवाळीचे अग्रीम आणि वेतन वेळेवर न मिळाल्यास रस्त्यांवर उतरण्याच्या तयारीत असल्याचा इशाराच एसटी महामंडळ प्रशासनाला दिला आहे. 

अधिक वाचाः  आता मास्क न वापरणाऱ्यांची खैर नाही, पोलिसांच्या मदतीने पालिका करणार कारवाई 

वेतन प्रदान कायद्यानुसार वेळेत वेतन देणे बंधनकारक असताना देखील एसटी कर्मचाऱ्यांचे पगार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन दिले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीसह जीवन जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे तात्काळ वेतन द्यावे अन्यथा आंदोलन करू.

मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)
 
दोन महीने वेतन नसल्याने अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. खायला अन्न नाही आणि कोविड योद्धा म्हणून उपाशी पोटी कर्तव्य करावे लागत आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नुकतेच आम्ही आत्मक्लेश आंदोलन केले आहे. तातडीने पगार देण्यात यावा अन्यथा कुटूंबासह रस्त्यावर उतरावे लागेल.
- संदिप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघंटना

दोन महिन्याचं वेतन थकले आहे. अगोदरच एस. टी. कर्मचाऱ्यांना वेतन कमी आहे. त्यात दोन महिने वेतन न मिळाल्याने कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे सोशल माध्यमांवर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून तीव्र भावना  व्यक्त होताहेत. सरकारने तात्काळ वेतनासाठी पैसे द्यावेत.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी कॉंग्रेस

----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Anger ST workers over two months overdue wages aggressive ST workers union


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anger ST workers over two months overdue wages aggressive ST workers union