Sushma Andhare: अनिल जयसिंघानिया यांना 'त्यांनीच' शिवसेनेत आणलं?; अंधारेंच्या दाव्याने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushama ANdhare, Devendra Fadnavis and Eknath Shinde

Sushma Andhare: अनिल जयसिंघानिया यांना 'त्यांनीच' शिवसेनेत आणलं?; अंधारेंच्या दाव्याने खळबळ

मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचं प्रकरण सध्या राज्यात पेटलेलं आहे. या प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीया आणि तिचे वडील अनिल जयसिंघानीया यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक खुलासा केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, जयसिंघानीया हा उल्हासनगरमध्ये राहातो. जेव्हा त्याने शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे हे होते. 'मातोश्री'त जिल्हाप्रमुखांशिवाय प्रवेश मिळत नाही. जयसिंघानीया यांना 'मातोश्री'वर कोणी आणलं? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंधारेंनी केली आहे.

हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

दरम्यान, याप्रकरणी सभागृहात बोलतांना देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये आमचे काही मित्र सहभागी आहेत, असं विधान केलं होतं. तर एकनाथ शिंदेंनी अनिल जयसिंघानीया हा माणूस सर्व पक्ष फिरुन आल्याचं सांगितलं होतं. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांनी दिलेला इशारा हा त्यांचे मित्र असलेल्या मुख्यमंत्र्यांकडेच होता का? श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची उल्हासनगरमधील जागा कोणाची आहे? असे प्रश्न अंधारेंनी उपस्थित केले.

प्रकरण काय?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासंबंधाने लाचेचं प्रकरण सध्या चांगलंच वादात आहे. हा सगळा कट देवेंद्र फडणवीसांना अडकवण्यासाठी आखण्यात आला असावा, असा दावा पोलिसांनी केला आहे. अनिक्षाने अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचे काही बनावट व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपही बनवल्या आहेत. अनिक्षाने त्यांच्याकडे १० कोटी खंडणीची मागणी केली होती.

अनिक्षाने या क्लिप्स अमृता फडणवीसांना पाठवल्या आणि त्या डिलीट करण्याच्या बदल्यात १० कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलिसांत धाव घेतली. पैसे दिले नाहीत, तर क्लिप व्हायरल करू अशी धमकी आपण अमृता फडणवीसांना दिल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं.