अंजली दमानियांना दिलासा ; गुन्हा रद्द करण्याचे आदेश

सुषेन जाधव
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरील यावल पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्दसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल असून, खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात खडसेंना प्रतिवादी करण्याचे आदेश देत राज्यशासन व यावल (जि. जळगाव) पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. याचिकेच्या सुनावणीत अंजली दमानिया यांच्यावर दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमुर्ती विभा व्ही कंकणवाडी यांनी मंगळवारी (ता. 28) दिले. 

दमानिया यांच्यानुसार, भुजबळ यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी खडसे आणि भुजबळांच्या विरोधातील प्रकरणे मागे घेण्यासाठी दबाव आणला होता. काही दिवसांनी भुजबळांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेत त्यांनी दमानियांवर आरोप केले. खडसेंना पैशाच्या आरोपात अडकविण्याचा प्रयत्न दमानिया यांनी केल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर दहा दिवसांनी खडसेंनी ऐकीव माहितीच्या आधारे दमानियांविरूद्ध यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून दमानियांविरोधात गुन्हा दाखल केला. खडसे यांनी 22 विविध प्रकारचे गुन्हे दमानिया यांच्यावर दाखल केलेले आहेत.

सतत धमकी मिळत असल्याने मध्यंतरी दमानिया जळगाव येथे जाऊन आल्या. परंतु त्यांना अटक करण्यात आली नव्हती. दमानिया यांच्या विविध तक्रारीवरून पोलिसांची चौकशी सुरू झाली होती. दमानिया यांनी यावल पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी अॅड. सतेज जाधव यांच्यावतीने खंडपीठात याचिका दाखल केली. 

दमानियांचा युक्तीवाद 

खंडपीठात युक्तीवाद करताना दमानिया यांच्याविरूद्ध सर्व ऐकीव माहितीच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. केवळ सूड घेण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल केला. याचिकेत खडसेंसह, राज्यशासन आणि रावेर पोलिस निरीक्षकांना प्रतिवादी करण्यात आले.

प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (ता. 28) खंडपीठात झाली असता दमानियांवरील यावल पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. खडसेंतर्फे अॅड. विनायक दीक्षित, राज्य शासनातर्फे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, दमानियातर्फे अॅड. सतेज जाधव यांनी काम पाहिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anjali Damaniya console Order to cancel the Cases