esakal | सोलापुरातील कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी "ऍन्टिजेन'चा पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सोलापूर शहर व जिल्ह्यात ऍन्टिजेन टेस्ट करण्यासाठी दोन लाखांहून अधिक किट्‌सची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. या किट्‌स उपलब्ध झाल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऍन्टिजेनच्या माध्यमातून कोरोनाच्या चाचण्या केल्या जातील. वेळेत निदान करणे त्यामुळे अधिक सहज व सुलभ होणार आहे. 
-मिलिंद शंभरकर, 
जिल्हाधिकारी, सोलापूर 

सोलापुरातील कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी "ऍन्टिजेन'चा पर्याय

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापुरातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. 12 एप्रिल ते 29 जून कालावधीत सोलापूर शहर व जिह्यातील तब्बल 2 हजार 609 व्यक्ती कोरोनाबाधित झाले आहेत. तर 264 व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात कधी येणार? या प्रश्‍नाचे ठोस उत्तर सध्या कोणाकडे दिसत नाही. त्यातच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीच कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने कमालीची चिंता व्यक्त होत आहे. राज्य सरकारने सोलापूरसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कोरोनाच्या रॅपिड अँटीजेन डिटेक्‍शन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या टेस्टवरच सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात येऊ शकतो? अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. 

महापालिका हद्दीतील संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यासाठी जवळपास दोन लाख किटस्‌ची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. जिल्हा परिषद हद्दीतील व्यक्तींच्या कोरोना चाचणीसाठी एक लाख किटस्‌ तर सोलापुरातील वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 50 हजार अशा एकूण जवळपास अडीच लाख ऍन्टिजेन टेस्टची मागणी जिल्ह्याच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. आयसीएमआरने ऍन्टिजेन टेस्टला मान्यता दिल्याने आता कमी वेळेत जास्तीत जास्त व्यक्तींची कोरोना चाचणी करता येणे शक्‍य होणार आहे. 

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत असलेल्या भागातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील ज्येष्ठ नागरिक, अन्य आजाराने त्रस्त व्यक्तींसाठी ऍन्टिजेन टेस्ट प्राधान्याने वापरली जाणार आहे. या टेस्टमध्ये फक्त अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल मिळणार असल्याने मोठा त्रास कमी होणार आहे. दवाखान्यात गेल्यास मला तेथून कोरोनाची लागण होईल? या भीतीपोटी अनेक जण दवाखान्यात जाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व अन्य आजाराच्या व्यक्ती कोरोना चाचणीला सामोऱ्या जात नाहीत. त्याचा परिणाम या व्यक्ती शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येतात आणि मृत पावतात. सोलापुरात कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींत ज्येष्ठ नागरिक, अन्य आजाराच्या व्यक्ती व शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या व्यक्तींची टक्केवारी 80 टक्‍क्‍यांच्या जवळपास आहे. सोलापुरातील भविष्यातील कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी ही टेस्ट उपयुक्त मानली जात आहे. 

स्वत: खरेदी व पुण्याकडून उसनवारीचाही प्रयत्न 
सोलापूर जिल्हा प्रशासनाने मागणी केलेली ऍन्टिजेन किट उपलब्ध करण्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे काही किट्‌स खरेदी करण्याचाही प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर शेजारी असलेल्या पुणे जिल्ह्यात येत्या एक ते दोन दिवसांत या किट्‌स उपलब्ध होणार आहेत. पुण्यातून काही किट्‌स उसनवारी पद्धतीने सोलापूर जिल्ह्यासाठी घेतल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या किट्‌स प्राप्त झाल्यानंतर पुणे जिल्ह्याला त्यातील किट्‌स परत करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.