esakal | आता बलात्काऱ्यांना 21 दिवसांतच फाशी
sakal

बोलून बातमी शोधा

REDDAY.jpg

आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा पास केला आहे. याअंतर्गत बलात्काराच्या घटनेनंतर 21 दिवसात  दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाणार आहे.

आता बलात्काऱ्यांना 21 दिवसांतच फाशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : येथे डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला जाळण्यात आले. या घटनेने देशभरात जनक्षोम उसळला आहे. याचपार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा पास केला आहे. याअंतर्गत बलात्काराच्या घटनेनंतर 21 दिवसात  दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाणार आहे.

बुधवारी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत खटल्याच्या सुनावणीबरोबरच दोषींच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गुरुवारी राज्य सरकार विधानसभेत हे विधेयक सादर करणार आहे. या विधेयकात भारतीय दंड संहीता 354 मध्ये संशोधनात्मक बदल करण्यात आले असून नवीन कलम 354 (ई) तयार करण्यात आले आहे. सध्या देशात बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद नाही. पण आंध्र प्रदेशचे दिशा कायदा विधेयक पास झाल्यानंतर आंध्र प्रदेश हे बलात्काऱ्यांना फाशी देणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी तेलंगाणात डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला जाळण्यात आले. या घटनेनंतर दिशा कायद्याबरोबरच अन्य काही कायदे राज्यात लागू करण्यात आले आहेत. यात महिला व बालकांवरील अत्याचारांचे खटले विशेष न्यायालयात चालवण्यात येण्याची तरतूद आहे.

प्रस्तावित ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’अंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत ७ दिवसांमध्ये तपास आणि १४ दिवसांमध्ये न्यायालयात खटला चालवण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसंच या २१ दिवसांमध्ये आरोपीला शिक्षाही ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो. या प्रकरणांसाठी १३ जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ, अॅसिड हल्ले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर, बालकांवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहे.