

सोलापूर : एक पालक किंवा दोन्ही पालक नसलेल्या निराधार शाळकरी विद्यार्थ्यांना (१८ वर्षांखालील) शासनाच्या वतीने बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून दरमहा दोन हजार २५० रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. पण, योजनेच्या लाभासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असण्याची अट आहे.
घरातील कर्ता पालक किंवा आई-वडिलांचा अचानकपणे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांमधूनच शिक्षण सोडावे लागू नये म्हणून त्यांना शासनाच्या बालसंगोपन योजनेतून अर्थसाहाय्य दिले जाते. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सहा हजार विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत. अजूनही दररोज जिल्हा महिला बालविकास कार्यालयाकडे लाभार्थींचे अर्ज येतच आहेत. सद्य:स्थितीत अंदाजे २०० लाभार्थींचे अर्ज कार्यालयाकडे चौकशीसाठी प्रलंबित असून, त्यावर कार्यवाही सुरू आहे. लाभार्थीला अनुदान मिळू लागल्यानंतर प्रत्येक वर्षी गृहचौकशी व दर तीन महिन्यांतून एकदा गृहभेट दिली जाते. योजनेच्या माध्यमातून मदत करून त्या लाभार्थींची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे या हेतूने गृहभेटी दिल्या जातात.
योजनेच्या लाभासाठी ‘ही’ कागदपत्रे जरुरी
मयत पालकाचा मृत्यू दाखला
पालक व लाभार्थी विद्यार्थ्याचे आधारकार्ड
तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला
लाभार्थीचे किंवा संयुक्त बॅंक पासबुक
घरासमोर उभारलेला पालक व लाभार्थीचा फोटो
पाच महिन्यांपासून अनाथांना नाही अनुदान
ज्या विद्यार्थ्याचे दोन्ही पालक किंवा घरातील कर्ता पालक मयत झाला आहे, त्या अनाथ, निराश्रित बालकांना बालसंगोपन योजनेतून शैक्षणिक खर्चासाठी दरमहा २२५० रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. मात्र, आता शाळा सुरू झाल्या असून, त्या निराश्रित बालकांकडे शालेय शुल्क भरायला किंवा शालेय साहित्य खरेदीसाठी पैसे नसल्याची स्थिती आहे. तरीसुद्धा राज्य शासनाकडून या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी २०२४ पासून योजनेतून अर्थसाहाय्य मिळालेले नाही. दर आठवड्याला लाभार्थी विद्यार्थी जिल्हा महिला बालविकास कार्यालयाकडे त्यासंदर्भात चौकशी करत आहेत. पण, पाच महिने झाले अद्याप योजनेसाठी निधी मिळालेला नाही हे विशेष.
लाभार्थींनी ‘या’ ठिकाणी साधावा संपर्क
योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी सात रस्ता परिसरातील शोभा नगरातील जिल्हा महिला बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय ०२१७-२३१०६७१ या क्रमांकावर देखील संपर्क साधता येईल, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.