‘डीएड’ प्रवेशासाठी ११ जूनपासून करा अर्ज! इयत्ता बारावीत ४४.५० गुण मिळालेल्यांनाही मिळणार प्रवेश; अर्जासाठी १०० व २०० रुपयांचे शुल्क

‘डीएड’ची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून ११ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीत ४९.५० टक्के तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बारावीमध्ये ४४.५० टक्के गुण मिळाले, त्यांनाही ‘डीएड’साठी प्रवेश मिळणार आहे.
DEd admission
DEd admissionsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षक होण्यासाठी ‘डीएड’चा उत्तम पर्याय आहे. या कोर्सची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता. २६) सुरू झाली असून ११ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीत ४९.५० टक्के तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बारावीमध्ये ४४.५० टक्के गुण मिळाले असतील तर त्यांनाही ‘डीएड’साठी प्रवेश मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात सहा अनुदानित व २२ खासगी ‘डीएड’ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी ‘डीएड’साठी प्रवेश घेऊ शकतील. त्यासाठी www.maa.ac.in या संकेतस्थळावर त्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासाठी २०० रुपये तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १०० रुपये भरावे लागणार आहेत. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी शासनाने निश्चित केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना साडेबारा हजार ते १८ हजार रुपयांचे शुल्क मोजावे लागणार आहे. दरम्यान, १२ ते १५ वर्षांपूर्वी ७५ टक्के गुण मिळूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता. त्यावेळी तीन प्रवेश फेऱ्या व विशेष प्रवेश फेरी राबवूनही अनेकजण प्रवेशापासून वंचित राहत होते.

कला शाखेबरोबरच विज्ञान व वाणिज्य शाखेतून ८० ते ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा कल ‘डीएड’कडेच होता. पण, सध्या ४५ ते ५० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी देखील ‘डीएड’कडे पाठ फिरवत असल्याची वस्तुस्थिती आहे. मागच्या वर्षी प्रवेश क्षमतेपैकी ३० ते ३५ टक्के प्रवेश शिल्लक राहिले होते. विद्यार्थी मिळत नसल्याने १५ वर्षांत जिल्ह्यातील ४० पेक्षा अधिक ‘डीएड’ कॉलेज बंद करावे लागले आहेत. यंदा २८ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता १५०० असून तेवढे प्रवेश होतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदा प्रवेशासाठी २८ महाविद्यालये

‘डीएड’ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना ११ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करून प्रवेश घेता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा २८ महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुरू आहेत.

- जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर

‘डीएड’ची प्रवेश प्रक्रिया

  • एकूण महाविद्यालये

  • २८

  • प्रवेश क्षमता

  • १,५००

  • प्रवेश शुल्क

  • १०० ते २०० रुपये

  • प्रवेशाची मुदत

  • ११ जूनपर्यंत

नवीन शैक्षणिक धोरणात ‘डीएड’ नाही

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखडा अंतिम झाला असून तो देशभर २०२९ पूर्वी लागू होणार आहे. त्यामध्ये ‘डीएड’ अभ्यासक्रम अंतर्भूत नाही. नव्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना शिक्षक होण्यासाठी इयत्ता बारावीनंतर चार वर्षाचा ‘बीएड’चा इंटिग्रेटेड कोर्स करावा लागणार आहे. त्यावेळी विद्यार्थ्यास ‘बीएड’सह पदवीचे देखील प्रमाणपत्र मिळणार आहे. कदाचित, तो बदल होऊन त्यानुसार कार्यवाही सुरू होत असताना आता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे डीएड पूर्ण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com