Sanjay Raut : मला अटक करणं, देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक; राऊतांची डरकाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

Sanjay Raut : मला अटक करणं, देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक; राऊतांची डरकाळी

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात १०० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत यांना बुधवारी जामीन मंजूर झाला. यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. यावेळी समर्थकांच्या आणि शिवसैनिकांच्या मोठ्या गर्दीला आपल्या घराजवळ संबोधित करताना संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. (Sanjay Raut first reaction after coming out of jail in Patra Chawl Case)

हेही वाचा: श्रीकांत शिंदेंमुळे 'अच्छे दिन येणारच; जलील यांचा शिंदे पिता-पुत्रावर कौतुकाचा वर्षाव

संजय राऊत म्हणाले की, मी घरी आलोय. माझ्या सुटकेने संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कसा असतो, हे आज महाराष्ट्राने पाहिलं. याच रस्त्यावरून मला अटक करून घेऊन गेले होते. तेव्हाही मी सांगितलं होतं की, मरण पत्कारेन पण शरण जाणार नाही.

राऊत पुढं म्हणाले की, मी शिवसेना आहे. मागील तीन-चार महिन्यात शिवसेना उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती तुटलेली नाही. ही बुलंद शिवसेना आहे. अंधेरीच्या निवडणुकीने दाखवून दिलं की, शिवसेनेची मशाल पेटली आहे. आता त्यांना कळेल की, मला अटक करून किती मोठी चूक केली. देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक म्हणजे संजय राऊतांना अटक केली, असंही राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा: Sanjay Raut: 'भारत जोडो यात्रे'त सामील होणार राऊत? सुटकेनंतर काँग्रेसकडूनही स्वागत

न्यायालयाने सांगितलं की, राऊतांचा कोणताही गुन्हा नाही. मला कितीही वेळा अटक करा मी शिवसेनेला त्यागणार नाही. मी भगव्याबरोबर जन्माला आलो आणि भगव्याबरोबरच जाईल, असंही राऊत यांनी म्हटलं. मला १०३ दिवस कारागृहात ठेवलं, आता मी १०३ आमदार निवडून आणणार आणि पुढचा मुख्यमंत्री आपल्या शिवसेनेचाच होणार, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

टॅग्स :BjpShiv SenaSanjay Raut