Vidhan Sabha 2019 : आपला नेता नक्की शिवसेनेचा की राष्ट्रवादीचा?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

अनेक वर्षांपासून सेनेत कार्यरत असल्यामुळे शिवबंधन हाती कायम राहिल. मात्र, माझ्या मनामध्ये अजूनही राष्ट्रवादी आहेच, असे वक्तव्य डहाकेंनी केल्याने ते नक्की सेनेचे की राष्ट्रवादीचे हा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.

कारंजा : राज्यात सध्या विधानसभा निवडणूकांचे वारे वाहत असल्याने या क्षेत्राशी संबंधित अनेक किस्से आणि बातम्याही ऐकिवात येतात. निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात होण्याअगोदरही आणि आता सुरू झाल्यानंतरही अनेक घटना आणि प्रसंग घडत आहेत. काही घटना मजेशीरदेखील आहेत. अशीच एक घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. 

वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने राजकीय वर्तुळातील सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ते यासाठी की, हा उमेदवार नक्की राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे की शिवसेनेचा आहे? हाच संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. प्रकाश डहाके असं या उमेदवाराचं नाव आहे. डहाके हे राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांचे मेव्हणेदेखील आहेत.

त्याचं झालं असं की, गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 2014 च्या निवडणुकीत प्रकाश डहाके यांना उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाराजी दर्शविली होती. पवार यांनी तिकीट नाकारल्यामुळे डहाकेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कारंजा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांना उमेदवारी दिली आहे. भाजप-सेनेची युती असल्याने डकाहे या युतीच्या कचाट्यात सापडले. 

कारंजा मतदारसंघात प्रचारासाठी आलेल्या शरद पवार यांच्या जाहीर सभेत डहाके यांनी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर हजेरीदेखील लावली होती. पवार यांच्या उपस्थितीत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी डहाके यांना स्वगृही परतण्याचे आमंत्रण दिले. राष्ट्रवादीने डहाकेंना उमेदवारीही जाहीर केली. मात्र, त्यास शिवबंधन तोडण्यास डहाकेंनी नकार दिला.  

अनेक वर्षांपासून सेनेत कार्यरत असल्यामुळे शिवबंधन हाती कायम राहिल. मात्र, माझ्या मनामध्ये अजूनही राष्ट्रवादी आहेच, असे वक्तव्य डहाकेंनी केल्याने ते नक्की सेनेचे की राष्ट्रवादीचे हा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी डहाकेंना शिवबंधन बांधले होते. डहाकेंच्या भूमिकेवरून मतदारांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाचा फटका सध्याचे भाजपचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांना बसणार हे उघड आहे. 

डहाकेंच्या पाठीमागे 70 हजार मराठा मतदान आहे. तर पाटणी हे वाशिम येथील रहिवासी असून ते अल्पसंख्याक आहेत. डहाके या अगोदर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क आणि राजकीय वजनही भरपूर आहे. मात्र, जर डहाके दोन्ही पक्षाच्या व्यासपीठावर दिसत असतील, तर मग नक्की कोणाला मत द्यायचे? हाच यक्ष प्रश्न मतदारांसमोर उभा राहिला आहे.

शिवसेना

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : पंकजा मुंडेच म्हणतात, 'परळीत टफ फाईट होईल'

- Vidhan Sabha 2019 : ...यासाठी महायुतीला साथ द्या; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन

- INDvsSA : संथ फलंदाजीत भारताच्या पहिल्या दिवशी 3 बाद 273 धावा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Karanja Vidhansabha candidate Prakash Dahake