आई शब्दातच ब्रह्मांड आहे 

सचिन तेंडुलकर 
Monday, 16 November 2020

आम्हा भावंडांच्या डोक्‍यावर आईच्या रूपाने कायम आहे. तिचा आशीर्वाद लाख मोलाचा आहे आम्हा भावंडांसाठी. जीवनाच्या या टप्प्यावरही कोणत्याही कठीण समस्येवर आईचा सल्ला धीर देऊन जातो. 

आमच्याकडे गंमतच होती, वडील आणि त्यांचे नातेवाईक सगळे उंच होते. परंतु त्यांच्यात कोणी जास्त खेळाडू नव्हते. त्या उलट आई आणि तिचे नातेवाईक जरा गिड्डे होते; परंतु सगळे कोणता ना कोणता खेळ खेळायचे. म्हणून मी म्हणेन की मी आईच्या वळणावर गेलो आहे. 

आई म्हणजे प्रेमाचे आगर होते. मी घरातील शेंडेफळ असल्याने माझ्यावर विशेष प्रेम होते. ती माझे भरपूर लाड करायची. मी कॉलनीतील मित्रांसोबत खेळून घरी यायचो खूप भूक लागलेली असायची म्हणून स्वयंपाकघरात शिरायचो. आई मला हातपाय तोंड नीट, साबण लावून धुऊन ये, असे वारंवार सांगायची. बघा आजही तिचे ते बोल या काळात किती लागू पडतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझ्या खेळण्याची प्रगती बघून माझी नुसती शाळाच नाही बदलली, तर पालक म्हणून सर्वांत कठीण निर्णय घेतला तो म्हणजे मी साहित्य सहवास सोडून काका-काकूंकडे शिवाजी पार्कला रहायला जायचे. मला शाळा आणि आचरेकर सरांचे प्रशिक्षण दोनही जवळ पडावे म्हणून घेतलेला तो निर्णय सर्वार्थाने निर्णायक ठरला. माझी आई नोकरी करायची. तिचे ऑफिस सांताक्रुझला होते. ती रोज ऑफिस संपल्यावर मला भेटायला यायची. बसने गर्दीत शिवाजी पार्कला काकूच्या घरी मला थोडावेळ भेटून परत घरी जायची. मी लहान होतो मला वाटायचे त्यात काय...आई आहे माझी तिने मला भेटायला एव्हढेतर केलेच पाहिजे. माझी मुले शाळेत जायला लागल्यावर अगदी कधीतरीच मी खेळत नसून घरी असायचो, तेव्हा मी पॅरेंट टीचर मिटींगला जायचो. मला वाटायचे की मी मुलांसाठी किती करतो. आज मला तिने किती कष्ट केले, याची जाणीव होते. लहान असताना मला ती पोच नव्हती. मला यश मिळावे म्हणून ती सतत देवाचा जप करायची. कोणकोणते नवस आईने बोलले आणि फेडले हे तिचे तिलाच माहीत. देवाची कृपा आहे की मातृछत्र अजून आम्हा भावंडांच्या डोक्‍यावर आईच्या रूपाने कायम आहे. तिचा आशीर्वाद लाख मोलाचा आहे आम्हा भावंडांसाठी. जीवनाच्या या टप्प्यावरही कोणत्याही कठीण समस्येवर आईचा सल्ला धीर देऊन जातो. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(शब्दांकन : सुनंदन लेले) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about sachin tendulkar mother