पुणे - ‘राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानासाठी पाचशे कोटींची तरतूद केली आहे. चांगली गोष्ट आहे, तंत्रज्ञानाला आम्ही विरोध करत नाही. उलट आम्ही सर्वोच्च दर्जाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे या मताचे आम्ही आहोत.
परंतु, हे तंत्रज्ञान कारखानदारांच्या सोईनेच वापरले जाणार आहे का?’ असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला. तसेच ‘‘एआयचा वापर उसाच्या काटामारी आणि साखरेच्या उताऱ्यात होणारी चोरी रोखण्यासाठी करा,’ अशी मागणीही शेट्टी यांनी केली.
साखर आयुक्तालयामध्ये साखर आयुक्तांची शेट्टी यांनी मंगळवारी (ता. २२) भेट घेतली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एआय तंत्रज्ञानाबाबत तातडीने पाऊले उचलली, पाचशे कोटींची तरतूद केल्याचे सांगत शेट्टी म्हणाले, ‘साखर कारखाने काटा मारतात.
त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे, पंधरा ते वीस टक्के काटा मारला जातो. काटामारीतून जमा झालेल्या काळ्या पैशाचा राजकारणासाठी वापर होतो. शेतकऱ्यांची लूट होते. याठिकाणी एआय तंत्रज्ञान का वापरले जात नाही? हा प्रश्न मी साखर आयुक्तांना विचाराला.’
राजू शेट्टी म्हणाले, ‘माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचे टोकाचे मतभेद विसरून एकत्र आले आणि शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान मिळाले पाहिजे म्हणून वारंवार बैठका घेतल्या. ही चांगली गोष्ट आहे.
पण या दोघांनी शेतकऱ्यांच्या उसाची जी काटामारी होते, साखरेच्या उताऱ्याची चोरी होते या विषयावरही अशाच बैठका घेतल्या असत्या, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आनंद झाला असता.’
शेट्टी म्हणाले...
- पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या मार्फत शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान देण्यात यावे.
- हे सगळे एकत्र येत आहेत तर शेतकरी ही एकत्र येऊ ना.
- स्वराज्य पक्षासोबत झालेली युती ही निवडणुकीपुरती होती.
- एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय झाला. पण अनेक कारखान्यांनी शेवटच्या पंधरवड्याची बिल अद्याप साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिली नाहीत.
- अनेक कारखान्यांनी जी एफआरपी दिली आहे ती अर्धवट दिली आहे.
त्यांचे नाते अधिक घट्ट होऊ द्या...
शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याच्या प्रश्नावर शेट्टी म्हणाले, ‘त्यांचे नाते अधिक घट्ट होऊ द्या, आमचे म्हणणे काहीच नाही. पण उसामध्ये एआय तंत्रज्ञान येण्यासाठी ते दोघे ज्या पद्धतीने एकजुटीने प्रयत्न करत आहेत.
त्याच पद्धतीने जर का काटामारीसाठी आणि साखरेच्या उताऱ्याच्या चोरीच्या विरोधात एकजुटीने प्रयत्न केला तर राज्यातील सर्वात आनंदी माणूस मी असेल. महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की, वैचारिक परिवर्तन होत नाही. परस्पर विरोधी मताची माणसे सुद्धा एकत्र भेटत असतात. ती आपली संस्कृती आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.