Lokmanya Tilak : लोकमान्यांनी शंभर वर्षांपूर्वी स्वदेश हितरक्षणाच्या दृष्टीने केलेला विचार म्हणजे आजचा आत्मनिर्भर भारत

देशाच्या संरक्षणसिद्धतेत ‘आत्मनिर्भरता’ हा विषय सध्या आत्मीयतेने पुढे आणला जात आहे. लोकमान्यांचे पुण्यस्मरण करत असताना या गोष्टींचे महत्त्व किती आहे ते सांगायची आवश्यकता नाही.
Lokmanya Tilak : लोकमान्यांनी शंभर वर्षांपूर्वी स्वदेश हितरक्षणाच्या दृष्टीने केलेला विचार म्हणजे आजचा आत्मनिर्भर भारत

संरक्षणसिद्धतेसाठी ‘आत्मनिर्भरते’ची कास सध्या देशाने धरली आहे. शतकापूर्वी लोकमान्यांनी स्वदेश हितरक्षणाच्या दृष्टीने यासंबंधीचा सखोल विचार केला होता. त्यांच्या पुण्यातिथीनिमित्त आजही प्रस्तुत असलेल्या त्यांच्या विचारांचे स्मरण.

देशाच्या संरक्षणसिद्धतेत ‘आत्मनिर्भरता’ हा विषय सध्या आत्मीयतेने पुढे आणला जात आहे. लोकमान्यांचे पुण्यस्मरण करत असताना या गोष्टींचे महत्त्व किती आहे ते सांगायची आवश्यकता नाही. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, अशी चतु:सूत्री लोकमान्यांनी सांगितली होती, त्यामागे हा आत्मनिर्भरतेचा भाग होता.

‘पुण्यातील पहिली चिमणी’ हा अग्रलेख लिहिताना त्यांनी या देशाचा विकास पाहिलेला होता. अशा अनेक ‘चिमण्या’ उभ्या राहतील तर आपले स्वदेशीचे स्वप्न कसे पुरे होईल, हेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी ‘द बाँबे को ऑपरेटिव्ह स्वदेशी स्टोअर’ उभारताना याच स्वदेशीचे दालन आम जनतेसाठी खुले केले होते.

त्यासाठी त्यांनी आपल्यासमवेत रतनजी जमशेदजी टाटा, शेठ गोवर्धनदास खटाव मकनजी, शेठ द्वारकादास धरमसी यांच्यासारख्या उद्योगपतींना घेतले होते, इतकेच नव्हे तर अनेक गिरणी मालकांना भेटून त्यांच्याकडून स्वस्त दरातले कापड तेव्हाच्या या ‘मॉल’साठी उपलब्ध करून दिले होते. वास्तविक त्यांची या स्वदेशीच्या स्टोअरची कल्पना १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनापासूनची, पण नंतरच्या काळात त्यांच्यामागे राजद्रोहाचे शुक्लकाष्ट लागल्याने त्यांची ही कल्पना १९१५ मध्ये अस्तित्वात आली.

‘स्वदेशी’ची संकल्पना लोकांच्या गळ्यात उतरवायची, तर त्याबरोबरच बहिष्काराचीही हाक द्याायला हवी, हे त्यांनी ओळखले होते. हा बहिष्कार विलायती मालावर की विलायतच्या सरकारवर, असा काहीसा ओढूनताणून वाद मवाळांकडून निर्माण करण्यात आला आणि टिळकांना सुरतेत काँग्रेसबाहेर घालवण्यात आले. त्यांची बहिष्काराची ही हाक नंतर प्रत्यक्षात आली. तथापि या हाकेने काही कोटी रुपयांच्या विलायती मालाला फटका बसला.

स्वाभाविकच टिळकांवर लक्ष ठेवण्याची ‘गरज’ टिळकांवर लक्ष ठेवून असलेल्या तेव्हाच्या मुंबई पोलीस आयुक्ताने १९०७ मध्येच ब्रिटिश गव्हर्नरला सांगितली होती. काहीही करून टिळकांना जास्तीत जास्त शिक्षा द्यायला हवी, असेही त्याने सूचित केले होते. त्याचीच परिणती त्यांच्यावर राजद्रोहाचा दुसरा खटला भरण्यात झाली, ही वस्तुस्थिती आहे.

स्वदेशीचा अंमल राष्ट्रीय शिक्षणाशिवाय व्यर्थ आहे म्हणून त्यांनी पहिला आग्रह धरला तो राष्ट्रीय शिक्षणाचा. राष्ट्रीय शिक्षणात त्यांना देशी भाषांना उत्तेजन देणे अपेक्षित होते. ‘हे आमचे गुरुच नव्हेत’ या (१७ ऑक्टो. १९०५) च्या अग्रलेखात त्यांनी म्हटले आहे की, ‘हिंदुस्थानातील आमची कॉलेजे म्हटली म्हणजे मनास वा बुद्धीस उदात्त स्वरूप देऊन उत्साह आणणाऱ्या संस्था नव्हेत, आमचे विचार कोते करण्याकरिता, आमच्या मनाची व बुद्धीची वाढ परकीय राज्यकर्त्यांना जेवढी पाहिजे तितकीच ठेवण्याकरिता ही परकीय राज्यकर्त्यांना उत्पन्न केलेली मारक यंत्रे होत.

या यंत्रांच्या रगाड्यातून बाहेर पडलेल्या लोकांतही कधीकधी स्वतंत्र विचारांचे व उत्साहाचे अंकुर दृष्टीस पडतात; पण हा अपवाद होय. जात्यात जोंधळे घातले असता पिठामध्ये एखादा अखंड जोंधळा सापडतो, तशातला हा प्रकार आहे. व हा परिणाम राज्यकर्त्यांना जरी अनिष्ट असला तरी अपरिहार्य म्हणून तो त्यास सोसावा लागतो.’ थोडक्यात काय, तर आपल्या मुशीतून तयार झालेल्या पदवीधर विद्यााथ्र्यांमध्ये राष्ट्रीय विचारांचे वारे वाहूच नये, यासाठी तेव्हाच्या इंग्रज सरकारने घेतलेली ती ‘खबरदारी’ होती.

टिळक मंडालेहून परतले आणि त्यांनी स्वतःपुढे सर्वात महत्त्वाचा मुद्दा काँग्रेसप्रवेशाचा ठेवलेला होता. काँग्रेस पक्षात परतल्याशिवाय आपल्याला स्वराज्याचा लढा पुढे नेता येणार नाही, हे ते ओळखून होते. त्यांनी त्या काळात जे झंझावाती दौरे काढले होते ते याच उद्देशाने.

पहिले महायुद्ध सुरु होऊन थोडेच दिवस झालेले होते. अशावेळी लष्करभरतीसाठी ब्रिटिशांकडून खूप मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात येत होती. टिळकांवर त्या सरकारचा आक्षेप असा होता, की त्यांचा सैन्यभरतीला विरोध होता. ही गोष्ट खरीच आहे, पण सरसकट सैन्यभरतीला त्यांचा विरोध होता.

देश वाचवायचा असेल तर आपला विरोध सैन्य भरतीला नाही, पण तुमचे ‘ऑर्डर्ली’ बनून तुमच्या ट्रंका, वळकट्या उचलायला आमच्यापैकी कुणीही तयार होणार नाही, हे त्यांनी अनेक सभांमधून सांगितले. तुमच्या ११-१६ रुपयांकरता कोणी सैन्यात दाखल होतो असे नाही, त्यांनाही वरच्या पदांवर काम करावेसे वाटते, त्यांना देशाचे संरक्षण करावेसे वाटते, पण ते एकतर्फी असू नये.

तुम्ही आमच्या सैनिकांना वरच्या पदांना लायक ठरवणार असाल तरच आमचे देशबांधव तुमच्या सैन्यात प्रवेश करतील, असेही त्यांनी तेव्हा सांगितलेले होते. अशाच एका सभेत टिळकांनी आपल्या या धोरणाचा पुनरुच्चार करत सांगितले की, ‘वरच्या पदांसाठी पात्र ठरविणारी ही सैन्यभरती असेल तर सैन्यात जा, असे मी सर्वांना आवाहन करेन, इतकेच काय, जर सरकारने आमच्या या धोरणास होकार दिला तर केवळ महाराष्ट्रातून मी सैन्यासाठी पाच हजार जवान मिळवून देईन.’ आपल्या चिरंजीवांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी आपल्या मुलालादेखील सैन्यात जा, असे मी सांगेन, असे म्हटले होते.

तलवारीची मूठ

‘लष्करी शिक्षणाची शाळा’ या १८ मार्च १८९० च्या अग्रलेखात त्यांनी म्हटले होते की, ‘इंग्रजांचे राज्य तलवारीच्या जोरावर चालले आहे, पण त्या तलवारी कोणाच्या हाती आहेत आणि त्यापासून राज्याच्या चिरस्थायीपणास होणारी मदत किती, याचा जरा बारीक विचार केला पाहिजे. हिंदुस्थानच्या एकंदर सैन्यापैकी दोनतृतीयांश नेटिव्ह व एकतृतीयांश युरोपियन सैन्य आहे व नेटिव्ह सैन्यावरील मेजर-सुभेदारपर्यंत सर्व अधिकारीही नेटिव्हच आहेत.

यापेक्षा मोठ्या पगाराच्या अधिकारांच्या जागा युरोपियन लोकांच्या हातात आहेत खऱ्या; पण हा प्रकार सर्व खात्यात सारखाच लागू आहे.’ थोडक्यात वरच्या सर्व जागा त्यांनी आपल्या हातात ठेवल्या आहेत. म्हणजेच या तलवारीची मूठ त्यांनी आपल्या हाती ठेवलेली आहे, ती वाटेल तेव्हा वाटेल तशी चालवावी.

मंडालेच्या तुरुंगातून बाहेर पडताना त्यांना तिथल्या तुरुंगाधिकाऱ्याने विचारले होते की, ‘तुमची भावी योजना काय आहे?’ तेव्हा त्यांनी ‘‘देशात परतल्यावर जर्मनीत जायचा माझा विचार आहे’’, असे त्यास सांगितले होते. इंग्रजांना ही माहिती देऊन त्यांनी इंग्रजांना अस्वस्थ करून सोडले होते.

त्यामुळेच टिळकांवर सक्त पहारा ठेवण्याचे आदेश दिले गेले होते. टिळक हे मुत्सद्दी राष्ट्रीय नेते होते आणि ‘केसरी’तल्या लेखनातून त्या मुत्सद्दीपणाचे प्रतिबिंब दिसते.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व ‘मंडालेचा राजबंदी’, ‘टिळकपर्व’ या पुस्तकांचे लेखक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com