
अंध विद्यार्थ्यांना दृष्टीहिन प्रमाणपत्राची सक्ती नाही, शिक्षण मंडळाचे आदेश
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने (एचएससी) बारावीच्या परीक्षेसाठी अंध विद्यार्थ्यांना वेगळ्या दृष्टीहिन प्रमाणपत्राची सक्ती केली होती. कोरोना परिस्थितीत रुग्णालयात जाऊन प्रमाणपत्र आणणे धोकादायक आहे. शिवाय अधीचे अंपग प्रमाणपत्र असताना वेगळ्या प्रमाणपत्राचा हट्ट का? असा सवाल विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या माध्यमातून उपस्थित केला होता. बोर्डाने ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत विद्यार्थ्यांकडे असलेले मूळ प्रमाणपत्र परीक्षेसाठी ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात सध्या कोरोना महामारीचा विळखा आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी अंध विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी लेखनिकची गरज असते.
हेही वाचा: सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात
मात्र, लेखनिक देण्यासाठी शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना वेगळे प्रमाणपत्र (दृष्टीहिन) आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. लेखनिक मिळवण्यासाठी या विद्यार्थ्यांना दृष्टीबाधित असल्याचे प्रमाण पत्राद्वारे सिद्ध केल्यानंतरच लेखनिक घेता येणार होता. मुळात या विद्यार्थ्यांकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असतानाही बोर्डाने दिलेल्या प्रमाणपत्रावर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची स्वाक्षरी आणायची होती. कोरोनाच्या या भयंकर काळात या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालयात जाणे धोकादायक असून ते त्यांच्या जीवावरही बेतू शकते. आधीच अपंग प्रमाणपत्र असताना शालेय शिक्षण विभाग आमच्या जिवाशी का खेळत आहे? असा सवाल या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता. याबाबत ‘सकाळ’ने राज्यभरातील दिव्यांग, दृष्टिहीन विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांच्या प्रतिक्रियांचे वृत्त प्रकाशित केले होते. राज्य शिक्षण मंडळाने या वृत्ताची दखल घेतली आहे. सद्यःस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी सक्ती करु नये. विद्यार्थ्यांचे दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे. तसेच कोणताही दिव्यांग विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहाणार नाही. याची दक्षता घेण्याबाबतचे परिपत्रक राज्य मंडळाने जारी केले आहे.
Web Title: Aurangabad Breaking News No Need Cerficate To Blind Students For
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..