esakal | सप्टेंबरमध्ये देशात पाऊस ओलांडणार सरासरी
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

सप्टेंबरमध्ये देशात पाऊस ओलांडणार सरासरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पावसाळ्याचा शेवटचा महिना असलेल्या सप्टेंबरमध्ये देशात सरासरीच्या तुलनेत ११० टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने बुधवारी व्यक्त केली. कोकण आणि विदर्भात पाऊस सरासरी ओलांडेल तर, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पडेल. मराठवाड्यात सरासरी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान खात्याने या वर्षीपासून महिनानिहाय पावसाचा अंदाज जाहीर करण्याचे धोरण स्वीकारले. सांख्यिकी प्रारूप आणि ‘मल्टी मॉडेल एन्सेंबल’ (एएमई) या दोन्हींच्या आधारावर सप्टेंबरमधील पावसाचा हा अंदाज देण्यात आला आहे.

हवामान खात्याने जून ते सप्टेंबर या महिन्यातील पावसाचा अंदाज १६ एप्रिल रोजी दिला होता. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्ट या प्रत्येक महिन्यातील पावसाचा वेध घेण्यात आला. त्यानुसार आता सप्टेंबरचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याचे खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा: अनिल देशमुखांच्या जावयाची CBIकडून वीस मिनिटं चौकशी अन् सुटका

देशभरात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात १९६० ते २०१० या ५० वर्षांमध्ये सप्टेंबर महिन्यात सरासरी १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याच दरम्यान या वर्षीही पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

देशात जून ते ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा ९ टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशात १ जून ते ३० सप्टेंबर या दरम्यान पडणारा पाऊस सर्वसाधारण मात्र, सरासरीपेक्षा कमी नोंदला जाईल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

देशात कुठे कसा पडेल पाऊस?

(सरासरी, सरासरीपेक्षा जास्त आणि सरासरीपेक्षा कमी अशांत वर्गीकरण केले आहे.)

- मध्य भारत : सरासरीपेक्षा जास्त ते सरासरी पाऊस

- वायव्य आणि ईशान्य भारत : सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

- दक्षिण भारत : सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस

हेही वाचा: झेडपीच्या शाळांचा होणार कायापालट; अशा असतील सुविधा...

‘एलनिनो’चा प्रभाव नाही

प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह (एलनिनो) सध्या थंड असल्याचा निष्कर्ष समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि विषुवृत्तावरील प्रशांत महारासागराच्या हवेचे तापमान याच्या विश्लेषणावरून निघाला आहे. सध्या असलेली ‘एननिनो’ची स्थिती सप्टेंबरच्या अखेरपर्यंत तशीच राहील. त्यात बदल होण्याची शक्यता कमी आहे. तसेच, विषुवृत्ताच्या मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदले आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या शेवटीपर्यंत तेथे थंड पाण्याचा प्रवाह (ला निना) सक्रिय होण्याचे संकेत यातून मिळत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

‘एल निनो’ बरोबरच हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानाचाही मॉन्सूनवर प्रभाव पडतो. मात्र, तेथील सध्याची हवामान स्थिती सप्टेंबरअखेरपर्यंत कायम राहील, अशी माहिती वेगवेगळ्या हवामान प्रारुपातून मिळत आहे.

loading image
go to top