
वारकऱ्यांचे अपघात टळणार! ‘वारकरी मंडपा’ची सोलापूर ‘SP’ची आयडिया
सोलापूर : राज्यातील रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आषाढी, कार्तिकी, चैत्र व माघी वारीच्या निमित्ताने राज्यातील कानाकोपऱ्यातून पायी चालत पंढरीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा प्रथमच ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर ‘वारकरी मंडप’ टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याठिकाणी वारकऱ्यांना मार्गावरील वाहनांची वर्दळ, अडथळे व ब्लॅकस्पॉटबद्दल माहिती दिली जाईल. त्यानंतर वारी जसजशी पुढे मार्गस्थ होईल, तसे त्यांना पेट्रोलिंगद्वारे वारंवावर सुरक्षिततेच्या अनुषंगाने सूचना केल्या जाणार आहेत.
माघी वारीच्या निमित्ताने यंदा पंढरपूरमध्ये अंदाजित साडेचार लाख भाविक येतील, असे ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. माघवारीला सोलापूरसह विदर्भ, मराठवाड्यातून वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. या वारीसाठी वारकऱ्यांची संख्या आषाढी, कार्तिकीच्या तुलनेत कमी असते. तरीपण, रस्ते अपघात वाढले असून सोलापूर जिल्हा त्यात राज्यात टॉपटेनमध्ये आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी नवसंकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पायी चालत येणारी वारी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, नातेपुते (ता. माळशिरस), सांगोला, टेंभूर्णी, बार्शी येथे प्रवेश करतात. जिल्ह्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ग्रामीण पोलिसांचे मंडप (पेन्डॉल) उभारले जाणार आहेत. वारकऱ्यांना अपघातात जीव गमवावा लागू नये या हेतूने त्याठिकाणचे पोलिस अंमलदार वारकऱ्यांना मदत करणार आहेत.
वारीसाठी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त
पंढरीच्या पांडुरंगाच्या माघी वारीसाठी यंदा साडेचार लाख भाविक येतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त नेमला जाणार आहे. चार पोलिस उपअधीक्षक, १७ पोलिस निरीक्षक, ९५ सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, एक हजार २० पोलिस अंमलदार आणि एक ‘एसआरपीएफ’ची कंपनी बंदोबस्तासाठी असेल. त्यांच्या मदतीला ७०० होमगार्ड देखील नेमले जातील, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी दिली.
सुर्यास्तापूर्वी प्रवास करावा
जिल्ह्यात रस्ते अपघात वाढले असून वाहनांची वर्दळ मोठी आहे. त्यामुळे पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांनी सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंतच चालावे. रस्त्याच्या डाव्या बाजूनी चालावे. सुर्यास्तापूर्वी मुक्कामी पोचावे. वारकऱ्यांना पोलिसांकडून पेट्रोलिंगच्या माध्यमातून सतर्क केले जाणार आहे.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
दरवर्षी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दिंडीच्या माध्यमातून पायी चालत येतात. अनेकदा अपघातात काही वारकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. यापुढे तसे अपघात होऊ नयेत म्हणून यंदा चोख नियोजन केले आहे. पोलिसांचे मंडप वारकऱ्यांसाठी मदत केंद्रे म्हणून काम करतील.
- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण