"आत्ता फायर ऑडिट करताय, आतापर्यंत दुर्घटना होण्याची वाट बघत होते का?"

Bala Nandgaonkar criticized State Government over Bhandara Incident
Bala Nandgaonkar criticized State Government over Bhandara Incident

भंडारा ः जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीने होरपळून, गुदमरुन १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांनी येथे भेटी दिल्या. आता राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार, असे सरकार सांगत आहे. मग आतापर्यंत काय झोपले होतात काय की ही घटना होण्याची वाट बघत होता, असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. 

बाळा नांदगावर यांनी आज रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. ते म्हणाले, आज येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आगीतून वाचलेली मुले आहेत, त्यांच्या पालकांनाही भेटलो. ज्यांनी आगीतून चिमुकल्यांना वाचवले, त्यांनाही भेटलो, त्यांचे कौतुक केले. येथील प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण चौकशी सुरू आहे, असे सांगून माझ्या प्रश्‍नांची फार काही उत्तरे त्यांनी दिली नाहीत. 

फायर ऑडिट जर झाले नाही, तर ते करण्यासाठी काय प्रयत्न केले. कामगारांना प्रशिक्षण दिले होते का. रुग्णालयाला मंजुरी द्यायची असल्यास त्याला ‘सी’ प्रमाणपत्र द्यावे लागते. फायर ऑडिट जर करायचे असेल तर त्याला ‘बी’ प्रमाणपत्र द्यावे लागते. त्याच्याशिवाय रुग्णालय सुरूच करता येत नाही. 

बी प्रमाणपत्र देताना अग्निशमन यंत्रणा हाताळणारा स्टाफ असावा लागतो आणि तो प्रशिक्षित असावा लागतो. मी विचारलेल्या एकाही प्रश्‍नाचे उत्तर डीनकडे नव्हते. आता चौकशीतून सत्य काय ते बाहेर येईल, अशी अपेक्षा करुया. पण सरकारच्या आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे १० निष्पाप जिवांचे बळी गेले. त्या कुटुंबांचं झालेलं नुकसान आम्ही काय कुणीही भरून देऊ शकत नाही. कोणतीही घटना घडल्यानंतरच का सरकारला जाग येते, असा प्रश्‍न नांदगावकर यांनी केला. मुंबईतही पुल पडल्यानंतर सर्वांना जाग आली होती. आपल्या राज्यात मंत्रालय सुरक्षित नाही तेथे राज्यभरातले रुग्णालय कसे सुरक्षित राहतील, असा प्रश्‍न उपस्थित करुन त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. 

लोकांचे जीव गेल्यावर लाखो रुपये त्यांना द्यायला तुम्ही येता. पण आपल्या निष्काळजीपणामुळे लोकांचे नाहक जीव जाणार नाहीत, याची काळजी सरकारने घेतली पाहीजे, असे बाळा नांदगावकर म्हणाले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com