
मराठा महासंघाची समतोल भूमिका : शशिकांत पवार
मुंबई : छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या बांधकामाच्या वादात लोकमान्य टिळकांसारख्या महापुरुषाला ओढण्याचे घाणेरडे राजकारण कोणी करू नये तसेच मशिदीसमोर हनुमान चालिसाचे वाचनही करू नये, अशी स्पष्ट व समतोल भूमिका, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड शशिकांत पवार यांनी घेतली आहे. महासंघाच्या शिवाजी मंदिर कार्यालयात आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने झालेल्या बैठकीत ते बोलत होते. समाजात दुही निर्माण करणारी कोणतीही वक्तव्ये मराठा महासंघाच्या विचारसरणीला मान्य नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची बांधणी महाराष्टातील सर्व नागरिकांनी मिळून केली आहे. तसे पुरावेसुद्धा इतिहास संशोधकांकडे आहेत, तशा नोंदी देखील आहेत. त्यामुळे त्या वादात लोकमान्य टिळकांसारख्या महापुरुषाला ओढून जाती पातीचे राजकारण करणे हे योग्य नाही. या असल्या घाणेरड्या राजकरणाचा महासंघ निषेध करीत आहे, अशा शब्दांत टिळकांवर टीका करणाऱ्यांना पवार यांनी चपराक दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र एकत्र करून स्वराज्याची संकल्पना मांडली व सुराज्य निर्माण केले. त्याच विचारावर सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्यात सर्वांचे हित आहे. मुळात इतिहासात महान कार्य केलेल्या व्यक्तींवरून आता असे वाद घालून आज गरिबांच्या भुकेचा व रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही. किंबहुना तसे केल्याने जातीय विद्वेष वाढण्याखेरीज काहीच होणार नाही. ही छत्रपती शिवरायांची शिकवण नाही, हे सर्वांनी ध्यानात ठेवावे, असेही ते म्हणाले.
हनुमान चालीसा सर्वांनी मंदिरात किंवा स्वतःच्या घरात वाचावी. मशिदीत नमाज पठण केली जाते तिथे हनुमान चालीसा वाचण्याचे कारण काय ? फारतर ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न चर्चेने किंवा कायदेशीर मार्गाने सोडवावा, असे आवाहनही पवार यांनी केले. मराठा तरुणांनी कुठल्याही राजकीय पक्षात काम करावे, पण जाती धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना विरोध करावा. राज्यातील जनतेत जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचे कोणत्याही पक्षाचे कारस्थान हाणून पाडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Web Title: Balanced Role Maratha Federation Lokmanya Tilak Not Dragged Controversy No Hanuman Chalisa Front Mosque Shashikant Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..