Vedanta Foxconn | महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का ? थोरातांचा CM शिंदेंना सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thorat criticizes vedanta foxconn project on CM Eknath Shinde

Vedanta Foxconn महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का ? थोरातांचा CM शिंदेंना सवाल

महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का ? असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपस्थित करत वेदांता-फॉक्सकॉन कंपनीवरुन टीकास्त्र सोडले आहे. (Balasaheb Thorat criticizes vedanta foxconn project on CM Eknath Shinde )

वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. हा प्रकल्प राज्याच्या बाहेर गेलाच कसा,असा सवाल विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारला विचारला जात आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. १.५८ लाख कोटींचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातलाच कसा गेला? रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला आणि महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का ?, असे सवाल उपस्थित करत शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

थोरातांनी ट्विट करत , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार सोहळे व देवदर्शनात व्यस्त आहेत. त्यांनी थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता. आता गुंतवणूकही गेली आणि लाखो रोजगारही गेले. हे का झाले? याचा खुलासा सरकारने करावा. अशी मागणी केली आहे.

बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला. आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत. याचे गांभीर्य या सरकारला नाही. १.५८ लाख कोटींचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातलाच कसा गेला? रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला आणि महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का? असा प्रश्न थोरातांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला आहे.