
राज्यात औरंगाबादच्या नामांतराचा विषय सध्या गाजत आहे. महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षाचे नेते सातत्याने यावरून टीका करत आहेत. तर दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीमध्ये नामांतराच्या मुद्द्यावरून मतभेद असल्याचंही म्हटलं जात आहे.
मुंबई - राज्यात औरंगाबादच्या नामांतराचा विषय सध्या गाजत आहे. महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षाचे नेते सातत्याने यावरून टीका करत आहेत. तर दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीमध्ये नामांतराच्या मुद्द्यावरून मतभेद असल्याचंही म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना औरंगाबाद नामांतराबाबत प्रश्न विचारण्यात आला. मंगळवारी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, समन्वय समितीची बैठक दर मंगळवारी असते आणि त्यासाठीच आम्ही भेटलो. नामांतराचा वाद आमच्यामध्ये नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
महामंडळ सदस्यांच्या निवडीचा निर्णय़ या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. जिल्हा सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णयही होईल असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. या चर्चेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे सविस्तर चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
हे वाचा - कोरोना लसीकरणासाठी राज्यात ५११ केंद्रे
गेल्या काही दिवसांपासून राज्यात नामांतराचा वाद सातत्याने चर्चेत येत आहे. नामांतराच्या मुद्द्यावर आघाडीतील नेत्यांची वेगवेगळी मते असल्यानं आघाडीत बिघाडीची चर्चाही होत आहे. मात्र नामांतरावर बाळासाहेब थोरात यांनी काहीच न बोलता मौन बाळगणं पसंद केलं.