नवे संकट ः‘लम्पी’च्या भीतीने जंगल चराईबाबत घेण्यात आला हा निर्णय 

राजेश रामपूरकर
Monday, 7 September 2020

‘लम्पी स्किन डिसीज’ यावर नियंत्रण आणण्यासाठी संरक्षित जंगलाशेजारील पाच किलोमीटरच्या परिसरातील गावागावांमधील जनावरांचे लसीकरण करावे. रोगाचा प्रसार करणाऱ्या चवणाऱ्या माशा, डास, गोचिडाचा नायनाट करावा. तसेच संरक्षित क्षेत्रासह जंगलातील जनावरांची चराई काही काळ बंद करावी करण्यात यावी. 

नागपूर ः कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच जनावरांना देखील ‘लम्पी स्कीन डिसीज’ या आजाराने ग्रासले आहे. त्या आजाराचे संक्रमण वन्यप्राण्यांना होऊ नये म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रातील ६० ते ७० टक्के भागातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच पाळीव जनवारांना संरक्षित जंगलातील चराईवर बंदी केल्याची माहिती पुढे आली आहे. 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारील गावांमधील पाळीव जनावरांना लंपी आजार होऊ लागल्याचे वन विभागाच्या लक्षात आले. वन विभाग स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली आणि बफर आणि कोअर क्षेत्रातील गावांमधील जनावरांच्या लसीकरणाचा कार्यक्रम आखला. तसेच आजार झालेल्या जनावरांवर उपचार केले. या आजार झालेल्या जनावरांचा मृत्यूदर शून्य असला तरी विशेष काळजी घेतली जात आहे. कारण पाळीव प्राणी जंगलात चराईला जात असल्याने त्यातून या रोगाचा प्रसार गोवंशीय वन्यप्राण्यांना झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे कठीण असल्याने या आजाराविरुद्ध प्रशासनाने कंबर कसली आहे. हा आजार झालेल्या जनावरांना आता माणसांप्रमाणेच क्वारंटाईन करण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

धक्कादायक! नातेवाईकांनी शेवटच्या क्षणी चेहरा दाखवण्याची केली मागणी; अन प्लॅस्टिक बाजूला करताच...

‘लम्पी स्किन डिसीज’ आजार प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आजार आहे. दमट वातावरणामुळे कीटकांची मोठी वाढ होते. विशेषतः चवणाऱ्या माशा, डास, गोचिड, वेगवेगळे कीटक त्यांच्यामुळे या रोगाचा संसर्ग एका जनावरापासून दुसऱ्या झाडावर पोहोचतो. त्यामुळे या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी संरक्षित जंगलाशेजारील पाच किलोमीटरच्या परिसरातील गावागावांमधील जनावरांचे लसीकरण करावे. रोगाचा प्रसार करणाऱ्या चवणाऱ्या माशा, डास, गोचिडाचा नायनाट करावा. तसेच संरक्षित क्षेत्रासह जंगलातील जनावरांची चराई काही काळ बंद करावी करण्यात यावी असे मत पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. विनोद धुत यांनी सांगितले. 

संयुक्त लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे 

लम्पी आजाराचे संक्रमण झाल्यानंतर किमान दोन आठवड्यांपर्यंत तो जनावरांच्या रक्तामध्ये राहतो मग शरीराच्या इतर भागातही संक्रमण होत जात लसिका ग्रंथीना सूज येते. हा झूनोटिक रोग प्रकारातील आजार नसल्याने जनावरांपासून हा आजार फक्त गोवंशीय प्राण्यांना होतो. गवा हा गोवंशीय प्राणी असल्याने त्याला हा आजार होण्याची शक्यता असल्याने दक्षता घेणे गरजेचे आहे. कारण हा आजार वन्यप्राण्यांना झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग आणि वन विभागाने संयुक्तरित्या लसीकरणाची मोहीम हाती घेणे काळाची गरज आहे, असे पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शिरीष उपाध्ये म्हणाले. डॉ. खोव्रागडे म्हणाले, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर भागातील ७० टक्के गावांमधील जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban on Forest cattle Grazing Due to Lampi Disease