Anand Dighe: "26 ऑगस्ट 2001 रोजी धर्मवीराचा घात झाला की अपघात?" ठाण्यातील बॅनरची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Kadam Poster

"26 ऑगस्ट 2001 रोजी धर्मवीराचा घात झाला की अपघात?" ठाण्यातील बॅनरची चर्चा

मुंबई : ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी महेश परशुराम कदम यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर एक बॅनर लावले आहे. त्यामध्ये त्यांनी आमच्या धर्मवीराता घात झाला की अपघात? याचा उलगडा झालाच पाहिजे असा सवाल केला असून त्यांच्या या बॅनरमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.

"२६ ऑगस्ट २००१ रोजी नक्की आमच्या धर्मवीरांचे काय झाले? घात की अपघात? लवकरात लवकर ठाणेकरांना याचा उलगडा झालाच पाहिजे." अशा आशय या बॅनरवर लिहिला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बोलताना, "आनंद दिघेंसोबत जे घडलं ते मला माहिती आहे पण ते मी आजवर कुठेही बोललो नाही, त्यावर मी जर मुलाखत दिली तर भूकंप होईल." असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर महेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.

"ज्या दिघे साहेबांचे शिष्य म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काम केलं त्या दिघे साहेबांच्या निधनाबद्दल त्यांना माहिती असूनही ही गोष्ट बाहेर येण्यासाठी एवढे दिवस का लागतात? आता आम्हालाही याबद्दल उत्सुकता लागली असून आम्हाला जाणून घ्यायचं आहे." असं मत महेश कदम यांनी व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर ठाण्यात दिघेंसोबत घात झाला की अपघात अशा आशयाचे पोस्टर लागल्याने नव्या वादाल तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीतही यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काल शिवसेनेबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंसोबत जे घडलं ते मला माहितीये पण त्याबद्दल बोललो तर भूकंप होईल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.