महिलेस विवस्त्र करून मारहाण: कोणी न्याय देता का न्याय?

प्रवीण खुंटे
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

उपेक्षित घटावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये स्थानिक प्रशासन कोणत्याही प्रकारची दखलपात्र भूमिका बजावताना दिसत नाही. सामाजिक संघटनांच्या दबावाशीवाय प्रशासन कारवाई करत नाही. स्थानिक माध्यमे देखील तालुक्यातील सामाजिक घटनांपेक्षा राजकिय घटनांवर अधिक भाष्य करताना दिसतात.- चंदन दिपक घोडके, मुक्त पत्रकार, श्रीगोंदा

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्तांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीत. मागील काही वर्षापासून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याही श्रीगोंदा तालुक्यात याचे प्रमाण अधिक असून या समाजाना न्याय मिळणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात अशा अनेक घटना घडल्याचा पाढाच भटक्या विमुक्तांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र सावंत यांनी वाचून दाखवला.

सावंत यांनी दिलेल्या माहिती नुसार, डिसेंबर 2012 मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे एका सवर्ण समाजातील व्यक्तीच्या घरावर पारधी समाजातील व्यक्तीने दरोडा टाकल्याच्या संशयावरून आजूबाजूच्या गावातील अंदाजे तिनशे ते चारशे लोकांनी शासनाच्या गायरान जमिनीवर रहात असलेल्या आदिवासी, भटक्या विमुक्त व दलित समाजाच्या पालांवर हल्ला केला होता. यामध्ये तब्बल 58 झोपड्यांचे नुकसान करून अनेक झोपड्यांना आग लावण्यात आली होती. याचवेळी दिसेल त्याला मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर येथील पिडीतांनी लिंपणगाव सोडून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही सामाजिक संघटनांच्या दबावामुळे पोलिसांनी या प्रकरणात तब्बल 250 लोकांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, एवढे मोठे जळीत कांड होऊनही लिंपणगावातील या आरोपींची न्यायालयाकडून पुराव्यांच्या अभावी निर्दोश मुक्तता झाली असून, पिडीत 58 कुटूंब आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

ढवळगाव, ता. श्रीगोंदा येथील मातंग समाजाच्या जनाबाई बोरगे या महिलेला सवर्ण समजातील लोकांनी अंगावर पेट्रोल टाकून भर दिवसा जाळून मारल्याची घटना 2010 मध्ये घडली होती. मौजे चिंभळा येथील मातंग समाजाचा महिला लक्ष्मीबाई अडागळे यांचा अंत्यविधी रोखण्याचा प्रयत्न केला होता. श्रीगोंदा फॅक्टरी जोशी वस्ती येथील नंदीवाला समाजाचा युवकचा यात्रेमध्ये धक्का लागला म्हणून जंगलेवाडी व ढोकराई येथील सवर्ण समाजाचा लोकांनी जोशी वस्तीवर हल्ला करून दहशत निर्माण केली असल्याच्या अनेक घटनांचे दाखले सावंत यांनी दिले.

मागील अनेक वर्षांपासून श्रीगोंदा तालुक्यीतल मुक्त पत्रकार आणि दलित आदिवासी यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांचा पाठ पुरावा करणारे चंदन घोडके यांनीही अशाच काही घटनांची माहिती दिली.

तिरमारी समाजाच्या दहा ते बारा वर्षाच्या दोन मुलांनी शेतामधील काकडी तोडली म्हणून त्या मुलांना गावात हातपाय बांधून, नग्न करून केबलच्या वायरने क्रुरपणे फटके मारण्यात आल्याचा प्रकार घडला होता.

जोशी वस्तवरील डवरी गोसावी समाजाचे युवक हिराचंद सावंत यांचे अपहरण करून त्याला श्रीगोंदा येथे घेऊन येऊन जबरी मारहाण केरण्यात आली होती. याच तालुक्यातील म्हातार पिंपरी या गावातील यात्रेच्या निमित्ताने मंदिरात सुरू असलेल्या जेवणाच्या पंक्तीमध्ये लखन शिरवाळे हा मातंग समाजाचा युवक जेवायला बसला होता. याचा राग मनात धरून जेवणाच्या ठिकाणावरच मंदिराच्या ट्रस्टींमधील काही सदस्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना घडली होती.

या सोबतच अशा प्रकराच्या अनेक घटना ज्या कधीही उजेडात आल्या नाहीत त्यांचीही संख्या बरीच आहे. या सर्व घटनांमधील समान धागा म्हणजे या घटनांमधील कोणत्याच प्रकरणांमधील आरोपींना कठोर शासन झाल्याचे निष्पन्न होत नाही.

उपेक्षित घटावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये स्थानिक प्रशासन कोणत्याही प्रकारची दखलपात्र भूमिका बजावताना दिसत नाही. सामाजिक संघटनांच्या दबावाशीवाय प्रशासन कारवाई करत नाही. स्थानिक माध्यमे देखील तालुक्यातील सामाजिक घटनांपेक्षा राजकिय घटनांवर अधिक भाष्य करताना दिसतात.- चंदन दिपक घोडके, मुक्त पत्रकार, श्रीगोंदा

या समाजांकडे पाहण्याचा दृष्टीकोण तुच्छतेचा असल्याने अशा प्रकराची हिन वागणून या समाजांना दिली जाते. पोलिस प्रशासन सुद्धा गुन्हेगारच्या नजरेतूनच पाहत असल्याने सवर्ण समाजाचे मनोधैर्य वाढते. मुळातच हे समाज आर्थिक, सामाजिक आणि राजकियदृष्ट्या मागसलेला असल्याने यांचा वापर केवळ मतदानापुरताच केला जातो.- भालचंद्र दत्तात्रय सावंत, भटक्या विमुक्तांसाठी काम करणारे समाजिक कार्यकर्ते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beaten By A Woman Nakedness In Nagar Shrigonda incident