विज्ञानवाद जोपासत वास्तव जीवन जगावे -  प्रा. राजन खान 

कारदगा ः साहित्य संमेलनात दीपप्रज्वलन करताना साहित्यिक प्रा. राजन खान. शेजारी खासदार प्रकाश हुक्केरी, प्रा. श्रीकांत नाईक, चंद्रकुमार नलगे, उत्तम पाटील, कल्पना रायजाधव, प्रदीप जाधव व इतर.
कारदगा ः साहित्य संमेलनात दीपप्रज्वलन करताना साहित्यिक प्रा. राजन खान. शेजारी खासदार प्रकाश हुक्केरी, प्रा. श्रीकांत नाईक, चंद्रकुमार नलगे, उत्तम पाटील, कल्पना रायजाधव, प्रदीप जाधव व इतर.
Updated on

मांगूर - देव, धर्म, जात, लिंगभेद, भ्रष्टाचार या पाच बाबींनी देशाची वाट लावली आहे. त्यातून बाहेर पडून सर्वांनी विज्ञानवाद जोपासत व माणूस बनून वास्तव जीवन जगावे, असे आवाहन  ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. राजन खान यांनी केले.

कारदगा (ता. चिक्कोडी) येथील साहित्य विकास मंडळातर्फे रविवारी (ता. 26) आयोजित 22 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.  श्रीकांत नाईक यांनी सरस्वती प्रतिमापूजन केल्यावर संमेलनास सुरुवात झाली. शिवूबाई गावडे यांनी स्वागत केले. मंडळाच्या अध्यक्षा कल्पना रायजाधव यांनी प्रास्ताविक केले.

प्रा. राजन खान म्हणाले,"प्रत्येकाला मरण येणार असून त्याला न घाबरता, आहे तोपर्यंत कर्मकांडात न अडकता सुखी जीवन जगले पाहिले. देशात धर्म टिकणार आहे का? हा प्रश्‍न असून धर्म म्हणजेच सद्यःस्थितीत रक्तपात अशी अवस्था आहे. धर्माचे ढोंग करायला नको. कारण आजवर त्यामुळे समाजात किंबहुना देशात दहशतवाद, दंगली, हाणामाऱ्या झाल्या आहेत. भारतीयांनी कोणताही मोठा शोध लावला नसून समाज-समाजात दुही माजविण्यासाठी जातीचा शोध लावल्याचे मात्र प्रकर्षाने जाणवते. साडे आठ हजारहून अधिक जातीच्या नोंदी सरकार दरबारी असून त्याशिवाय पोट जातींची संख्या वेगळी आहे. त्यामुळे आम्ही भारतीय जातीयवादी, धर्मवादी होऊन समाजासमाजात भांडणे लावत आहोत.'

खान म्हणाले, "संविधान दिन साजरा करत असलो तरी संविधान वाचलेले लोक किती? अशा प्रश्‍न पडतो. संविधान ही घरात बाळगण्याची वस्तू नसून तिचे पालन करणे आवश्‍यक आहे. तिचे पालन होत नसल्याने समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.``

भारतीय एक असते तर दहशतवाद, काश्‍मिरप्रश्‍न, दंगली पेटणे अशा समस्या राहिल्या असत्या का? 70 वर्षानंतरही आम्ही एक नसल्याने आहे तेथेच आहोत. शांततेने, सुखाने, एकोप्याने व माणूस म्हणून जगण्याचा संदेश देणारी अनेक रत्ने देशात जन्मली. त्यांची देवालये बांधली. त्यांना महात्मे केले, पण त्यांचे विचार किती आचरणात आणले, असेही खान म्हणाले.

खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले,"22 वर्षे चालणारे कारदगा येथील साहित्य संमेलन हे आता तालुका व जिल्हा पातळीवर व्यापक झाले पाहिजे. 25 वे संमेलन हे चिक्कोडीत जिल्हा पातळीवर करावे. त्यासाठी आपले पूर्ण सहकार्य राहिल. येथे सीमावाद नसून मराठी, कन्नड भाषिक भावाप्रमाणे राहत आहेत.' 

माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर साहित्यिक चंद्रकुमार नलगे, अजितराव देसाई-सरकार, प्रदीप जाधव, उत्तम पाटील, जिल्हा पंचायत सदस्या समित्रा उगळे, तालुका पंचायत सदस्य दादासो नरगट्टे, शिवाजी माळी, श्रेणिक पाटील, बाबासो नोरजे, अण्णासाहेब हावले उपस्थित होते. 

साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत घाणेरडे राजकारण

प्रा. राजन खान यांनी आपण अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलो असून या निवडणूक प्रक्रियेत घुसलेल्या घाणेरड्या राजकारणाबाबत संताप व्यक्त केला. मी मराठवाड्याचा, मी विदर्भाचा, मी अमूक, मी तमूक म्हणून मला निवडून द्या असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मी महाराष्ट्राचाच, या देशाचा, पृथ्वीचा अशी मानसिकता दिसत नाही, अशी खंतही व्यक्त केली. 

विकासात सीमावाद

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील रस्ता हा खड्ड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे सीमावादामुळे हा विकास थांबला का? असा प्रश्‍न पडतो. रस्त्याच्या तुकड्यावरूनही भांडणे होत असल्याचे यावरून दिसते. रस्ते चांगले पाहिजेत ही सर्वांची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com