Raksha Bandhan : रक्षाबंधनला बहिणीला देऊ शकता 'हे' हटके गिफ्ट्स

Best Unique Gift Ideas For Raksha Bandhan
Best Unique Gift Ideas For Raksha Bandhan

रक्षाबंधन जवळ आले आहे. तशीच राखी खरेदी करण्यासाठी बहिणींनी गर्दी केली आहे. यात भाऊराया पण मागे नाही. या रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट द्यावं? की जेणेकरुन ती खूश होईल. असा विचार जर भाऊरायांच्या डोक्यात घोळत असेल तर जास्त गोंधळून जाऊ नका. आपल्या बहिणींना सरप्राइज करण्यासाठी ड्रेस, ज्वेलरी, पुस्तक, वॉच या सगळ्या गोष्टी तर आहेतच. पण याहून जरा हटके, काहीशी महाग तर काहीशी स्वस्त अशी सगळ्यांच्या खिशाला परवडेल आणि बहिणींना खूश करेल अशा गिफ्ट आयडीयाज् खास 'सकाळ'च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. या पंधरा गिफ्ट पर्यायांपैकी एकतरी या रक्षाबंधनला तुम्हाला नक्कीच मदतीचे ठरेल.     

ई व्हाउचर हा भेटवस्तू देण्यासाठी सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. बहिणींना कधी काय हवं आहे, याचा अंदाज घेऊन डोक्याची मंडई झाली असेल तर बहिणींना ई व्हाउचरचे गिफ्ट देऊन त्यांच्या मनाप्रमाणे खरेदी करण्याचा आनंद त्यांना देता येईल. शिवाय शॉपिंग करताना मिळालेलं डिस्काउंट मुलींना किती सुख देऊन जातं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यासाठी ई व्हाउचर हा उत्तम पर्याय आहे.   

बॅग्ज् कॉम्बो देणे म्हणजे बहिणींना रोज लागणाऱ्या वस्तूंचा पसारा नीट ठेवण्यास मदत करता येईल. आजकाल अगदी हजार रुपयातही पाउच बॅग-स्लींग बॅग-हँण्ड बॅग असा कॉम्बो मिळतो. बॅग्ज् कॉम्बोमध्ये विविध आकार आणि डिझाइनच्या बॅग्ज् एका किमतीत मिळतात. ब्रॅण्ड आणि डिझाइननुसार बॅगची किंमत असेल. असे बॅग्ज् कॉम्बो ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर भरपूर उपलब्ध आहेत.          

बहिणीचे शेड्यूल फार धावपळीचे असेल तर स्पा पॅकेज म्हणजे तिला स्वतःचे लाड करुन घेण्याची दिलेली संधीच म्हणा ना. स्पामुळे तिला शारिरीक आणि मानसिक विश्रांती मिळेल. दगदगीतून बहिणीला चार निवांत क्षण जगण्यासाठी एखादं स्पा पॅकेज देऊन खूश करु शकतो.   

मुलगी रोज नट्टापट्टा करणारी असो किंवा साधी राहणारी, तरी तिला रोज त्वचेसाठी प्राथमिक कॉस्मेटीकची गरज पडतेच. जसे की, बॉडी लोशन, टॅल्कम पावडर/फेस पावडर, लिपबाम, हेअर ऑईल, शॅम्पू, बॉडी सोप/ बॉडी वॉश... तेव्हा बहिणीला रोजच्या वापरातील बेसिक कॉस्मेटीक पॅकेज दिले तर ती पुढच्या काही महिन्यांसाठी निश्चिंत होईल. तिचा आवडता ब्रॅण्ड किंवा आवडते प्रोडक्ट्सचा एक संच तुम्ही तिला दिलात तर हे रक्षाबंधनसाठीची हटके भेटवस्तू ठरेल.  

बहिणीला व्यायामाची आवड असेल तर तिला जिम, अॅरोबिक, योगा किंवा व्यायामाचा आवडता प्रकार यासाठी महिन्यांची वा वर्षाची मेंबरशिप मिळवून देऊ शकता. तिच्या आवडीनिवडीनुसार डान्स किंवा गायन क्लास लावून देणेही तिच्यासाठी खास भेट ठरेल.  

बहिणी या भावांपेक्षा जास्त क्रिएटिव्ह असतात. अहम्..अहम्.. बरं असो. पण ती जर का क्रिएटिव्ह, हॅण्डक्राफ्ट, पेंटींग अशा कामात आवड ठेवत असेल तिला स्टेशनरी जसे; मेमरी बुक, फन कॅलेंडर, कलरफुल पेन्स्/पेन्सिल्स्, क्राफ्ट पेपर, ग्लिटर्स, टेबल लॅम्प अशा वस्तूंचा संच देऊ शकता. 

आजकाल फक्त मुलांनाच नाही तर मुलींनाही नवनवीन गॅजेट्ची आवड निर्माण झाली आहे. ही आवड पाहता बाजारातही मुलींसाठी फॅन्सी आणि गर्ली गॅजेट्स उपलब्ध आहेत. यांपैकीच म्हणजे फॅन्सी हेडफोन, फॅन्सी स्मार्ट वॉच, फॅन्सी ग्लासेस, अॅनिमल स्पीकर्स असे काही उपयोगाच्या आणि त्यातल्या त्यात खिशाला परवडतील अशा वस्तू देऊन हे रक्षाबंधन स्मार्ट करा.

आपुलकी आणि प्रेमाच्या शब्दांपेक्षा दुसरं मनाला सुख देणारी भेटवस्तू काय असेल. भाऊराया तसा कमी बोलूनच बहिणीवरचं प्रेम व्यक्त करतात. पण अशा भाऊरायांना ही एक चांगली संधी आहे. आपल्या बहिणीबद्दलच्या भावना छानशा शब्दांनी व्यक्त करणारे पत्र लिहून तिला दिले तर ते वाचतानाचे तिच्या डोळ्यातील आनंदाचे अश्रू बघून तुम्हाला कळेल की तुमच्या अव्यक्त भावना तिच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत. 

आज प्रत्येकाला सुरक्षित आयुष्य हवं आहे. हे आयुष्य तुम्ही आपल्या बहिणीला भेट देऊ शकता. तिच्या नावे म्युचुअल फंडमध्ये पैसे गुंतवून तिला पुढच्या आयुष्यासाठी थोडं निश्चिंत करु शकता. कदाचित तिच्यावरचा कुटूंबाचा, मुलांचा किंवा तिच्या अपेक्षांच्या भाराला जरा हातभार लावता येईल. 

मोबाईल म्हणजे आयुष्याचा भाग नाही तर अर्ध आयुष्यच झालं आहे. मग त्याची बॅटरी टिकवून ठेवणे हे काम इतर कामे सोडून सतत करावं लागतं. त्यासाठी मोबाईल पॉवर बँक जर तुम्ही तिला भेट दिली ती बिनधास्तपणे कुठेही कधीही आपली कामे करु शकेल. 

याशिवाय ट्रेंडी मोबाईल केस दिलेत तर तिला तिच्या प्रत्येक ड्रेसला मॅच होणारे मोबाईल केस वापरता येईल. एखादा फोटो किंवा आपल्याला हवा असणारा संदेशही मोबाईल केसवर प्रिंट करता येतो. लोकल सलून मेंबरशिप ही भेटवस्तू म्हणजे वर्षभर बहिणीकडून हवी ती मदत मिळविण्याचा छुपा मार्गच समजा ना! बहिणींचे पार्लर प्रेम भावांपासून काही लपलेले नसेलच. मग पार्लरच्या खर्चाने वैतागलेल्या बहिणींना ही सलून मेंबरशिप फारच आनंद देणारी ठरेल. होममेड ज्वेलरी हाही एक गोड भेटवस्तू देण्याचा पर्याय आहे. युट्युब वर होममेड ज्वेलरीचे अनेक व्हिडीओज् आहेत. अगदी सोप्या सोप्या पध्दतीने घरच्या घरी सुंदर, नाजूक ज्वेलरी बहिणींसाठी तयार करु शकता. भावाने इतक्या प्रेमाने आपल्यासाठी घेतलेल्या प्रयत्नाने त्या किती खूश होतात बघाच. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com