Bharat Jodo Yatra Maharashtra : ‘भारत जोडो’ आजपासून महाराष्ट्रात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra Maharashtra

Bharat Jodo Yatra Maharashtra : ‘भारत जोडो’ आजपासून महाराष्ट्रात

नांदेड : कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सोमवारी (ता. सात) सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून महाराष्ट्रात दाखल होणर आहे. यात्रेचे स्वागत व यात्रेरम्यानच्या अन्य कार्यक्रमांची कॉँग्रेसतर्फे जय्यत तयारी झाली आहे. राज्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी येथे दाखल झाले आहेत. राज्यात सुमारे १४ दिवस यात्रा चालेल.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता. ६) सायंकाळी पत्रकार परिषदेत यात्रेसंदर्भातमाहिती दिली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, नसीम खान, हुसेन दलवाई, महिमा सिंग, मोहन जोशी, सचिन सावंत आदी उपस्थित होते. ही यात्रा तेलंगणात असून सोमवारी सायंकाळी साडेसातला देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल. देगलूर, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतून ही यात्रा मध्य प्रदेशात प्रवेश करेल.

बडी मंडळी देगलूरमध्ये

यात्रेच्या स्वागतासाठी कर्नाटक, तेलंगणच्या सीमेवरील देगलूर नगरी (जि. नांदेड) सज्ज झाली आहे. सुरक्षेसह अन्य यतारी पूर्ण झाली आहे. प्रवेशापूर्वीच्या पूर्वसंध्येला, आज सायंकाळी शहराच्या प्रवेशद्वारासह शहरात ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. खासदार राहुल गांधी हे सोमवारी देगलूरमध्ये मुक्कामी असतील.

शरद पवार, खर्गेंचाही सहभाग

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नांदेडमध्ये यात्रेत सहभागी होतील. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मेधा पाटकर यांनीही यात्रेत सहभागाची सहमती दर्शवली आहे. त्यांची नेमकी तारीख ठरलेली नाही. कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांचाही यात्रेत सहभाग असेल. त्यांचीही तारीख निश्चित नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.