उगाच राष्ट्रवादी सोडली; राष्ट्रवादीच्या 'या' माजी नेत्याला लागली रुखरुख

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 January 2020

  • मंत्रिपद न मिळाल्याने भास्कर जाधवांना रुखरुख

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोंडी होत असल्यानेच माजी मंत्री भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, सेना नेतृत्वानेही त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याचे आश्‍वासन दिले होते. पण अखेर ताज्या विस्तारामध्ये जाधव यांना संधी मिळू शकली नाही, यामुळे आपण उगाच राष्ट्रवादी सोडल्याची रुखरुख त्यांना वाटत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेनेत असताना कोकणातील आक्रमक नेत्यांमध्ये भास्कर जाधव यांची गणना होत असे. शिवसेनेकडून 1999 मध्ये निवडून आलेल्या जाधव यांना 2004 च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती. परिणामी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देत कालांतराने राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मंत्री, प्रदेशाध्यक्षपद अशी महत्त्वाची पदे त्यांना मिळाली.

शिवसेनेत नाराजीचा स्फोट; हे माजी मंत्री पुन्हा मातोश्रीकडे फिरकणार नाहीत

कोकणातील राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याशी त्यांचे बिनसले. उभयतांमधील वाद वाढत गेला. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने या वादाकडे कानाडोळा केला. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाधव यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकीत तटकरे यांच्याकडून दगाफटका होण्याची भीती जाधव यांना होती. सुमारे 15 वर्षांनी शिवसेनेत फेरप्रवेश केलेल्या जाधव यांना सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या ताज्या विस्तारात कोकणातील उदय सामंत यांना मंत्रिपद देण्यात आले. यामुळे जाधव यांचा भ्रमनिरास झाला. राष्ट्रवादी सोडली नसती तर मंत्रिपद नक्‍की मिळाले असते, असे त्यांचे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत.

शिवसेनेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना मिळणार 'हे' खाते?

कोणाला मंत्री करायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. ज्येष्ठतेच्या मुद्यावर आपला विचार व्हायला पाहिजे होता, ही आपली ठाम भावना आहे. अर्थात पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. - भास्कर जाधव, नेते शिवसेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhaskar Jadhav was unhappy about not getting the ministry