जग बदल घालुनी घाव...

annabhau-sathe
annabhau-sathe

सर्वसामान्यांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या उद्धाराचा मार्गही दाखवला. त्यांचे साहित्य वंचित, शोषित समाजाला अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देते आणि यापुढच्या काळातही देत राहील. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे साहित्य, कार्य आणि आठवणी यांना दिलेला उजाळा.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज जन्मशताब्दी. अण्णा भाऊंच्या जीवनाकडे पाहिले तर अत्यंत कठीण अशा जीवनसंघर्षाला तोंड देत त्यांनी केलेल्या साहित्यनिर्मितीने आपण अक्षरशः थक्क होतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ते पुढे आले. सर्वसामान्य माणसाचे जगणे आणि त्यातला त्याचा संघर्ष हा त्यांच्या साहित्याचा मुख्य विषय होता. सांगली जिल्ह्यातील वाटेगावात जन्म. त्या गावात जेमतेम दीड दिवसच ते शाळेत जाऊ शकले. गावी पोट भरता येत नसल्याने मुंबईची वाट धरावी लागली. जवळजवळ तीनशे मैलांची पायपीट करून ते मुंबईला पोचले. पोटाची खळगी भरण्यासाठी पडेल ती कामे केली. ती करत असताना वाचनाची आवड जोपासणे आणि वाचतावाचता लिहायला लागणे हेही नवलच. पण हे लिहिणे म्हणजे नुसते मनाचे रंजन नव्हते. त्यांना आस लागली होती ती समाज बदलण्याची. अगदी सहजपणे ते राजकीय-सामाजिक चळवळीकडे ओढले गेले. विशेषतः कम्युनिस्ट कार्यकर्त्यांबरोबर त्यांची जास्त जवळीक वाढली. कला पथकातून कथा लिहिण्याचा, गाणी लिहिण्याचा क्रम सुरू असताना असताना घरगडी- हमाली, लाकडे फोडण्याचे काम, गिरणीत काम, अशी अनेक कामे करण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण स्वाभिमानाने जीवन जगण्याचा खंबीरपणा त्यांनी दाखवला. अनेक पोवाडे, गाणी, कथांमधून सामाजिक विषमतेवर त्यांनी प्रहार केला. जनतेच्या प्रश्‍नांवर अचूक बोट ठेवून त्यांना संघर्ष करण्यास प्रवृत्त करण्याच्या लिखाणामुळे त्यात एक वेगळेच चैतन्य होते. त्यांच्या अनेक कांदबऱ्या, कथा, पोवाडे, गाणी प्रकाशित झाली. ते प्रसिद्धीच्या झोतात आले. लोकप्रियता वाढली; पण ती कधीच त्यांच्यावर स्वार झाली नाही. त्यांच्या साधेपणाला जराही धक्का लावू शकली नाही. हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे.

पुण्यातील अहिल्याश्रम येथे ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ची मोठी परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रमुख नेत्यांना व्यासपीठावर नेऊन सोडण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. मी सेवादल व समाजवादी पक्षाचा तरुण कार्यकर्ता होतो. अण्णा भाऊंना पूर्वी पाहिलेले नव्हते. ते आले व व्यासपीठावर जाऊ लागले, तेव्हा मी त्यांना थांबवले. ‘प्रमुख नेत्यांनाच स्टेजवर सोडण्याची माझी जबाबदारी आहे’, असे म्हणालो. अण्णा भाऊंनी ते ऐकले, थोडे हसले व बाजूला जाऊन थांबले. तेवढ्यात ना. ग. गोरे,  कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे यांच्यासमवेत एसेम जोशी आले व अण्णा भाऊंना बाजूला थांवलेले पाहून ‘अण्णा भाऊ, का थांबलात स्टेजवर चला ना’ असे म्हणाले. त्याचे कारण कळताच एसेम मला म्हणाले, ‘अरे, हे अण्णा भाऊ साठे.’ मग माझ्या डोक्‍यात प्रकाश पडला. मी थोडा धास्तावलो. सभा उत्तम झाली. अण्णा भाऊ आता आपल्याला काय म्हणतील, या विचाराने अस्वस्थ होतो. पण सभा संपल्यानंतर अण्णा भाऊ माझ्याजवळ आले व पाठीवर थाप मारत म्हणाले, ‘शाबास, दिलेले काम प्रामाणिकपणे केलेत.’ मी त्यांच्याकडे ओशाळून पाहत राहिलो. एवढा मोठा माणूस न रागावता बाजूला थांबतो काय आणि परत माझे कौतुक करतोय काय? मी त्यांचा चाहताच झालो, हे सांगायला नकोच. पुढे एका भेटीत अण्णांनी त्यांच्या रशिया प्रवासाचा मजेदार किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘रशियाला जाण्यासाठी ‘चितोड की राणी’ हे आंतरराष्ट्रीय विमान होते. विमानात बसलो. खाली पाहिले. दोन्ही हात जोडून भारतभूमीला नमस्कार केला. विमानाने भरारी घेतली. थोड्या वेळाने जागेवर जेवण आले. जेवल्यानंतर हात धुण्यासाठी बेसिनकडे गेलो. नळाचे पाणी सोडणे जमेना. माझी स्थिती पाहून हवाई सुंदरीने जगमधून माझ्या हातावर पाणी ओतले. मी दोन्ही हातांकडे पाहतच राहिलो. याच हातांनी मी गिरणी कामगार, घरगडी, हमाल, लाकडे फोडणे अशी कामे केलीत. म्हणून मला लगेच एक कवन सुचले आणि म्हणालो, ‘लाकडे फोडलेल्या हातावरती, हवाई सुंदरी पाणी ओती.’

लढण्याची प्रेरणा देणारे साहित्य 
दडपल्या गेलेल्या लाखो व्यक्तींना लढण्याची प्रेरणा देणारे साहित्य या माणसाने निर्माण केले. उच्चशिक्षित लोक चांगले साहित्य लिहू शकतात, असे मानले जाते. परंतु केवळ दीड दिवसाची शाळा शिकलेले अण्णा भाऊ मानवजातीच्या कल्याणाची कामना करणारे प्रभावी लेखन करतात, हा एक मोठा चमत्कार आहे. ‘जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव’, हे त्यांचे शब्द आजही वंचित समाजाला बळ देतात. अन्यायाच्या विरोधात रडायचे नाही, तर लढायचे आहे, असा संदेश ते देतात. त्यांच्या साहित्याला वैश्विक परिमाण आहे. ‘पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून, ती श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे’, असे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात सांगताना जगातल्या श्रमिकांचा त्यांनी सन्मान केला आहे. सर्वसामान्यांच्या दु:खाला वाचा फोडणाऱ्या अण्णा भाऊंनी त्यांच्या उद्धाराचा मार्गही दाखवला. अनेक परदेशी भाषांमधून त्यांच्या साहित्यांचे भाषांतर झाले आहे. अण्णा भाऊ अन्यायाविरूद्ध बंड करण्याचा, शोषणाविरूद्ध संघर्ष करण्याचा संदेश देतात. महिलांप्रति मोठा आदर त्यांच्या लेखणीत पदोपदी दिसतो. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. ते लेखक होते, कवी होते, गीतकार होते, नट, दिग्दर्शक अन्‌ शाहीरही होते. असा माणूस होणे विरळाच. त्यांच्या साहित्यात राष्ट्रप्रेम भरभरून वाहत आहे. लेखनात शृंगार आहे, पण बीभत्सता नाही; संघर्ष आहे; पण हिंसा नाही; मनोरंजनातूनही लोकशिक्षण करण्याची किमया ते साधू शकतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र राज्य निर्मितीत मोठे योगदान 
अण्णा भाऊ हे एक वेगळेच रसायन आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सेनानी स्व. एस्‌. एम्‌. जोशी यांचा सहायक म्हणून मी काम करत होतो. एसेम्‌ एकदा चर्चेत म्हणाले,‘ अण्णा भाऊ, अमर शेख व गव्हाणकर हे शाहीर नसते आणि विशेषतः अण्णा भाऊ यांची भेदक शाहिरी नसती, तर कदाचित महाराष्ट्र राज्याची निर्मिती काही दिवस पुढे गेली असती.’ महाराष्ट्र राज्य निर्मितीत अण्णा भाऊंचे मोठे योगदान आहे. त्यांची

 माझी मैना गावावर राहिली
माझ्या जिवाची होतीया काहिली

ही लावणी त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाली. जो मराठी भाषकांचा भाग महाराष्ट्रात आला नाही, त्याबद्दलची वेदना या कवनातून त्यांनी व्यक्त केली. अण्णा जिथे असतील तिथे हजारोंच्या संख्येने लोक जमत. जनतेत जागृती करण्याचे महत्त्वाचे काम अण्णा भाऊंनी केले. अण्णा भाऊंचे तत्त्वज्ञान हे सामाजिक परिवर्तनावर भर देणारे असून, त्यांनी श्रमाला महत्त्व दिले व ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’चे आग्रही तत्त्वज्ञान मांडले. त्यांनी माणूस हा केंद्रबिंदू मानला. शोषितांच्या आयुष्यात प्रबोधनाची आवश्‍यकता असून, तेच त्यांना चेतना देते व त्यांना योग्य दिशेला नेते, अशी ते आग्रही मांडणी करतात. ‘साहित्यातून नायक निर्माण करणारे ते खरे महानायक होते’, हे रा. ग. जाधव यांचे निरीक्षण मार्मिक आहे. श्रमिक, कष्टकरी महिला आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी अण्णा भाऊंनी आपली लेखणी झिजवली, त्या अण्णा भाऊंना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला नाही. त्यांना ‘भारतरत्न’ मिळावे, यासाठी मी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकारने तशी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. 

अण्णा भाऊ सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाचे काम करत. ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ ही हाक त्यांना भावत असे. लालबावटा कलापथकात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली व कम्युनिस्ट पक्ष वाढवण्यासाठी काम केले. ते कम्युनिस्टांबरोबर राजकीय चळवळीत होते; पण ते पोथीनिष्ठ नव्हते. मार्क्‍सबरोबरच महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्याही विचारांचा स्वीकार ते करू शकले ते या खुल्या मानसिकतेमुळे. सर्वसामान्यांमध्ये गुलामगिरीविषयी चीड निर्माण करणारे लोकमान्य टिळक यांच्यावरही त्यांनी कवन केले.

स्वराज्य माझा जन्मसिद्ध
हक्क करूनि गर्जना
लोक उठविला जागा केला.
त्या लोकमान्यांना
क्रांतिकारी वीरांना आणि
त्यागी हुतात्म्यांना
करूनि कवना, महाराष्ट्र भूच्या भूषणा
अशा या लोकशाहीराच्या स्मृतीस अभिवादन.

(लेखक ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्यकला प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

महाराष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com