ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

महापुरात बाधित झालेल्यांना महिन्याभरात साधी सुई सुद्धा विकत घ्यायला लागू नये, या कुटुंबांना महिन्याचे धान्य, कपडे, कुटुंबातील महिलेला साडी, पुरुषाला कपडे आणि दिवाळीसाठी लागणारे साहित्य देण्याचेही नियोजन आम्ही केले आहे. महापुरामुळे बाधित झालेल्या ४० गावांसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.
Jaykumar Gore Dahivadi Visit
Jaykumar Gore Dahivadi Visitesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : महापुरात बाधित झालेल्यांना महिन्याभरात साधी सुई सुद्धा विकत घ्यायला लागू नये, या कुटुंबांना महिन्याचे धान्य, कपडे, कुटुंबातील महिलेला साडी, पुरुषाला कपडे आणि दिवाळीसाठी लागणारे साहित्य देण्याचेही नियोजन आम्ही केले आहे. महापुरामुळे बाधित झालेल्या ४० गावांसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. या अधिकाऱ्याच्या खाली पाच ते सहा अधिकारी असणार आहेत. किती आणि काय साहित्य आवश्‍यक आहे? याची माहिती दोन सर्व्हेद्वारे दोन दिवसांत संकलित होईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा नियोजन भवनात बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री गोरे म्हणाले, सीना नदीच्या महापुराचा फटका जिल्ह्यातील साधारण ४० गावातील ४५०० कुटुंबांना बसला असल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे. हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाजही त्‍यांनी व्यक्त केला. येत्या आठवड्यात पूरग्रस्तांचे जीवनमान सुरळीत केले जाईल. या कालावधीत नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे एकत्रित अहवाल पाठविला जाईल.

पूर व्यवस्थापनाची माहिती घेऊ

धाराशिव जिल्ह्यातील सीना-कोळेगाव धरणातून सीना नदीच्या पात्रात खूप मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले. त्यामुळे जिल्ह्यात सीना नदीला महापूर आला. या कालावधीत जिल्ह्यातही सीनेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या धरणाच्या पूर व्यवस्थापनात काही चूक झाली आहे का? याचीही माहिती घेतली जाईल, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.

सर्व मदत शासनाकडून दिली जाईल

सध्या आम्ही पहिल्या टप्प्यात पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुरळीत करण्याचे आमचे ध्येय आहे. हे काम झाल्यानंतर वाहून गेलेली शेती, शेतीचे झालेले नुकसान याचे पंचनामे आपण करणार आहोत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व मदत शासनाकडून दिली जाईल.

- जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर

नुकसानीसंदर्भात ठळक बाबी...

  • सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाली ७९२ गावे, त्यातील 40 गावांमध्ये शिरले पुराचे पाणी

  • अतिवृष्टीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 8 नागरिकांचे मृत्यू झाले

  • मयत जनावरांची संख्या १५६ तर अतिवृष्टीत १८ हजार कोंबड्यांचा मृत्यू

  • ८८३ घरांची अंशत: पडझड झाली असून दोन लाख २३ हजार ६६१ शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.

  • सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे एक लाख ९६ हजार ५६१ हेक्टर नुकसान झाले आहे.

  • चार हजार ४१७ घरांमध्ये पाणी शिरले असून पंचनाम्याची कार्यवाही युद्धपातळीवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com