
MPSC चा मोठा निर्णय, राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार Descriptive
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या बदलाची अंमलबजावणी राज्यसेवा परीक्षा 2023 पासून केली जाणार आहे. वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून 2 हजार 25 गुण असे सुधारित योजनेचे स्वरुप असणार आहे. याबाबत प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. (MPSC Latest News In Marathi)
राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन (CAST) संदर्भात उमेदवारांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी तसेच राज्यसेवा मुख्य परिक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रमांचा एकत्रितपणे सर्वकष अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती नियुक्त करण्यात आली होती.
दरम्यान, या समितीच्या शिफारसीनुसार सी सॅट विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय एमपीएससीतर्फे घेण्यात आला होता. त्याशिवाय राज्यसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सुधारित करण्याचाही समावेश या समितीच्या कार्यकक्षेमध्ये होता. त्यानुसार आज आयोगाकडून समितीच्या शिफारसी आयोगाने स्वीकारल्या असूनस वरील निर्णय जाहीर केला आहे. (MPSC News In Marathi)