

सोलापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘राष्ट्र प्रथम’ अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ६७० शाळांमधील चौथी ते आठवीपर्यंतच्या मुलींना स्वसंरक्षणाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यभरातील शाळांमध्ये हे प्रशिक्षण सुरु आहे.
माजी सैनिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लष्करी शिस्तीचे धडे दिले जाणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून हे अभियान १५ जानेवारी २०२६ पासून सुरू झाले असून, २० मार्च २०२६ पर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. यामध्ये विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींना केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम न करता त्यांना मानसिकदृष्ट्याही कणखर बनविण्यावर भर दिला आहे. यात तायक्वांदो, कराटे, ज्यूदो, क्राव मागा, बॉक्सिंग यांसारख्या मार्शल आर्ट्सचा समावेश आहे. तसेच योगासने आणि प्राणायामाद्वारे मानसिक स्वास्थ्यावर काम केले जाईल.
‘स्मार्ट स्किल्स’अंतर्गत व्यक्तिमत्त्व विकास, निर्णयक्षमता आणि ताणतणाव व्यवस्थापनाचे धडेही विद्यार्थिनींना दिले जाणार आहेत. शाळांमध्ये शिस्त आणि देशरक्षणाची भावना रुजवण्यासाठी माजी सैनिक, एनसीसी आणि स्काउट- गाइड कॅडेट्सची मदत घेतली जाणार आहे. हे सैनिक विद्यार्थ्यांना परेड, संचलन आणि तिन्ही संरक्षण दलांची माहिती देणार आहेत. यासोबतच प्रबोधनकारांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांचे बीजारोपण केले जाणार आहे. हे प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी प्रत्येक शाळांनी वेळ निश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत.
६७० शाळांमध्ये उपक्रम
सोलापूर जिल्ह्यातील ६७० शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. याबाबत माजी सैनिकांसह शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शाळेतील समित्यांनीही प्रशिक्षणाची वेळ निश्चित करावी. प्रशिक्षणादरम्यान शाळेतील महिला शिक्षकांनी हजर असावे. आजारी असलेल्या मुलींना यातून सूट राहील.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.