esakal | यंदा, जाता पंढरीस कसे सुख वाटे जीवा?
sakal

बोलून बातमी शोधा

Big decision regarding Wari in the ashadhi pandharpur akola marathi sakal news

साधारण आषाढीच्या महिनाभर आधी भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागते. मात्र असे असले तरी यावर्षी पंढरीच्या वाळवंटात विठूनामाचा गजर मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे चित्र दिसते.

यंदा, जाता पंढरीस कसे सुख वाटे जीवा?

sakal_logo
By
विवेक मेतकर

उदंड पाहिले, उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रा महिमे ।।
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ।।
ऐसे संतजन ऐसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ।।
तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे । पंढरी निर्माण केली देवे। ।।

अकोला : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग दोन-चार ओळीतच पंढरीच्या विठुरायाकडे जाण्याची आम्हा वारकऱ्यांना दरवर्षी ओढ का लागते, हे सांगून जातो.


साधारण आषाढीच्या महिनाभर आधी भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागते. मात्र असे असले तरी यावर्षी पंढरीच्या वाळवंटात विठूनामाचा गजर मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे चित्र दिसते. एकंदरीतच कोरोना विषाणूचा विळखा जगभर घट्ट होत असताना याने अनेक क्षेत्रांना हादरवून ठेवले आहे. अनेक उद्योग, व्यवसाय यासह प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल होत आहे. मात्र, असे असले तरी कित्येक वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्राच्या आस्थेच्या आषाढी वारीमध्ये यावर्षी खंड पडतो की, काय अशी परीस्थिती निर्माण झाली आहे.


पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी जाणारा पायी दिंडी सोहळा होणार यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देहू, आळंदीसह विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश आणि राज्यातील प्रत्येक क्षेत्रातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी वारीच्या परंपरेत खंड पडू शकतो.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

विदर्भातून
विदर्भातील पंढरी म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथून श्री संत गजानन महाराज पालखीचा सोहळा वारकऱ्यांमध्ये दरवर्षी एक वेगळाच उत्साह, चैतन्य निर्माण करतो. मागील पन्नास वर्षांची या पालखीची परंपरा. पालखीसोबत ७०० वारकरी, तीन घोडे यासह दहा वाहनांचा ताफा असतो. हत्ती या पालखीचे प्रमुख आकर्षण असायचा. यासह अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथून आईसाहेब रुक्मीणीदेवींची पालखी, अकोला येथून श्रीक्षेत्र श्रध्दासागर, शिवराम महाराज पवार यांची वरूळ-जऊळका येथील पालखी, बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा येथील सोनाजी महाराज यांची पालखी, अकोट येथून नरसिंग महाराजांची पालखी आदी पालख्या दरवर्षी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतात.

मराठवाड्यातून
मराठवाडा ही तर संतांची भूमी, येथून जाणाऱ्या पालख्यांची, भाविकांची संख्याही त्यामुळेच खूप मोठी. सर्व सुख-दुःख, मोह, माया, अडीअडचणी, कामे बाजुला ठेवून डोईवर तुळशीचे रोप घेऊन आणि मुखी अखंड हरिनामाचे जप करीत टाळ-मृदंगाचा मधूर नाद करीत वारकरी मार्गस्थ होतात ते एकाच दिशेने. पालख्या पंढरीकडे निघालेल्या असतात. महाराष्ट्रातून संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, मुक्ताई यासह अनेक संतांच्या पालख्या विठूमाऊलीच्या चरणाची आस ठेवून मार्गस्थ होतात. या मोठ्या पालख्यांसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो छोट्या दिंडींच्या माध्यमातून हजारो पावले पंढरीच्या दिशेने निघालेली असतात. मराठवाड्यातून अनेक पालख्या जूनच्या मध्यावर निघतात. संत नामदेव, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज या मोठ्या पालख्या तर निघतातच, पण त्यासोबत अन्यही काही पालख्या आहेत, ज्यातून मोठ्या संख्येने भाविक आषाढीला पंढरपूरला पोहोचतात.

नांदेड जिल्ह्यातील कंधार येथून निघणाऱ्या ‘साधू महाराज दिंडी’ला तब्बल १५० वर्षांची परंपरा आहे. उमरखेडचे एकनाथ महाराज हे येथील मठाधिपती आहेत. ते स्वतःच या पालखीचे नियोजन करतात.


उमरखेडच्या सव्वाहात गल्लीमध्ये तीन मंदिरे आहेत. याच ठिकाणी साधू महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती. या साधू महाराजांचे गंगाखेड, कंधार, उमरखेड अशा तीन ठिकाणी मठ आहेत. या तीनही ठिकाणांहून निघून वारकरी कंधारला एकत्रित होतात आणि तिथून ते पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात.

हिंगोली येथील नरसी नामदेव हे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे जन्मस्थान. येथेच त्यांची वस्त्रसमाधी देखील आहे. नामदेवांनी पंढरपूरमध्ये जिवंत समाधी घेतली, परंतु नरसी नामदेवमध्ये कयाधू नदीच्या काठावर भव्य मंदिर आहे. तिथे नामदेवांची वस्त्रसमाधी आहे. हभप बळीराम महाराज सोळंके यांनी सुरू केलेल्या नामदेवांच्या पालखीत शेकडो वारकरी मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. नामदेवांची ही पालखी २४ गावांमध्ये मुक्काम करत भीमेच्या तीरावर दाखल होते. अंबाजोगाईत तिचे एक रिंगणही दिमाखात पार पडते.

देगलूरला धुंडा महाराजांचा मोठा भक्तगण आहे. येथून शेकडो वारकरी ‘धुंडा महाराज’ दिंडीसोबत ‍विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दरवर्षी जातात. दिंडीला १०० वर्षांची परंपरा आहे. वर्षानुवर्षे भक्तिभावाने सुरू असलेल्या या दिंडीची धुरा धुंडा महाराज, बंडा महाराज, निवृत्ती महाराज, गुरुबाबा देगलूरकर यांनी वाहिली आहे. ही दिंडी जवळपास पन्नास गावांतून भक्तिभावाचा संदेश देत आषाढ शुद्ध अष्टमीला पंढरीला पोहोचते.

परभणी जिल्ह्यातील दैठणा येथे ठाकूर बाबांचा मठ आहे. या परिसरातून मोठ्या उत्साहात त्यांची दिंडी निघते, तर गंगाखेडवरून जनाबाईंच्या पालखीत शेकडो वारकरी हरिनामाचा जप करीत मार्गस्थ होतात. पालममध्ये मोतीराम महाराजांचा भक्त परिवार मोठा आहे. या तालुक्यातून त्यांच्या तीन दिंडी वेगवेगळ्या मार्गांनी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. या तीनही दिंड्यांची आळंदीतील नोंदणीकृत पालख्यांमध्ये नोंद आहे.

राज्यातून निघणाऱ्या दिंडी, पालख्यांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या आपेगावहून निघणाऱ्या पालखीचा मान मोठा आहे.

पैठण तालुक्यातून निघणाऱ्या या पालखीला ८०० वर्षांहून अधिकचा इतिहास आहे. राज्यातून निघणाऱ्या प्रत्येक दिंडीत एकच पालखी असते. मात्र, या दिंडीमध्ये दोन पालख्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान महाराज आणि मुक्ताई यांची एक पालखी आणि त्यांच्या आई-वडिलांची एक पालखी अशा दोन पालख्या या दिंडीत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. आपेगाव पंचक्रोशीतून दोन-अडीच हजार वारकऱ्यांपासून सुरू होणाऱ्या या वारीत पंढरपूरपर्यंत वीस-पंचवीस हजार वारकरी सहभागी होतात.

देहूतून संत तुकाराम महाराज, आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीप्रमाणेच पैठणच्या एकनाथ महाराजांच्या पालखीचाही तेवढाच मान आहे. दरवर्षी आषाढीला एकनाथांच्या पालखीचा सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो. देहू-आळंदी ते पंढरपूर या रस्त्याचे पालखी सोहळ्यामुळे विस्तारीकरण केले गेले, पण मराठवाड्यातून जाणाऱ्या नाथांच्या पालखी मार्गावर वारकऱ्यांना अनेक ठिकाणी बिकट मार्गाने खडतर प्रवास करावा लागतो. पैठणमधून निघाल्यावर बीड जिल्ह्यातील रायमोहा ते गारमाथा या टप्प्यात घाट रस्ता आहे. हा या पालखी सोहळ्याचा महत्त्वाचा टप्पा. या ठिकाणी पालखीच्या बैलांना कठीण घाट पार करणे शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या चारशे वर्षांपासून नाथांच्या पालखीला हा घाटरस्ता पार करून देण्यासाठी हटकरवाडी येथील गावकरी पालखीच्या गाड्या ओढतात. चारशे वर्षांचा हा प्रघात अद्यापही सुरू आहे. पालखीबरोबर असलेल्या नाथांच्या वंशजांना खांद्यावर बसवून घाटावर नेतात. भानुदास एकनाथ आणि विठ्ठल रखुमाईच्या गजरात हा घाट आनंदात पार केला जातो.

जालना येथून पंचवीस वर्षांची परंपरा लाभलेली भगवान महाराज दिंडी शेकडो भाविकांना घेऊन टाळ-मृदंगाच्या निनादात दरवर्षी निघते. या दिंडीसोबतच आणखी दोन छोट्या दिंड्यांमधून वारकरी दरवर्षी नित्यनेमाने विठ्ठलाचे दर्शन घेऊन येतात.

आषाढी वारीला जाणाऱ्या पालख्यांमध्ये संत ज्ञानेश्वर, सोपान महाराज, निवृत्ती महाराज आणि मुक्ताई यांच्या पालख्या राज्याच्या विविध भागांतून निघतात.
 

खान्देशातील मुक्ताईनगरमधून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या पालखीला तब्बल ३०९ हून अधिक वर्षांची परंपरा आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह मध्यप्रदेशातूनही आलेले हजारो वारकरी कोथळी येथील मंदिर परिसरात जमतात आणि मुक्ताईच्या जयघोषात येथून ही पालखी निघते. वारकऱ्यांच्या उत्कट प्रेमाला यावेळी भरती आलेली असते. पंढरपूरचे अंतर जास्त असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वात आधी ही पालखी निघते. सुमारे साडेसातशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पालखीला ३४ दिवस लागतात.

आषाढी एकादशीशिवाय मराठवाड्यातून दोन वेळा पंढरपूरला पालख्या जातात. उस्मानाबादची संत गोरोबा काका पालखी दिवाळीनंतर तेर येथून निघते. ही कार्तिकी वारी. तर लातूर जिल्ह्यातील औसा येथून माघी एकादशीनिमित्ताने माघ महिन्यात औसेकर संस्थानची पालखी पंढरपूरला प्रस्थान करते.

वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याच्या सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घेत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच!
मात्र, कोरोना संकटामुळे गेल्या काही दिवसांपासून आषाढी वारीचं काय होणार? हा प्रश्न सर्व वारकऱ्यांना पडला होता. यावर अखेर आज निर्णय घेण्यात आला. आळंदी आणि देहुच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरवले जाईल. देहु आणि आळंदीहुन पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाल्याने यंदा पायी दिंडी सोहळा होणार तर नाहीच यासोबत अनेक वारकऱ्यांच्या नियमित वारीतही खंड पडू शकतो.

loading image