

तात्या लांडगे
सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या ‘टीईटी’ सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयात दुरुस्ती करावी किंवा तो निर्णय रद्द करावा, सर्वांनाच जुनी पेन्शन लागू करा, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा, १०० टक्के विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी द्या, शिक्षणसेवक पद रद्द करावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी आज (शुक्रवारी) शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन केले. मात्र, जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागाकडील दोन हजार १६२ शाळा सुरुच होत्या. सुमारे १७ हजार ८०० शिक्षक या आंदोलनापासून दूर राहिले.
राज्य शासनाचा संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ चा निर्णय अनेक शिक्षकांसाठी धोक्याची घंटा बनला आहे. पटसंख्येअभावी माध्यमिक शाळांमधील सुमारे सात हजार शिक्षक अतिरिक्त होत आहेत. दुसरीकडे २० पेक्षा कमी पटाचे वर्ग बंद होऊन तेथील अतिरिक्त शिक्षकांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. याशिवाय इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील सर्वच शिक्षकांसाठी (ज्यांच्या सेवानिवृत्तीला पाच वर्षे शिल्लक राहिले ते वगळून सर्वजण) दोन वर्षात ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यासाठी आता पुढचे एकच वर्ष शिल्लक आहे. या निर्णयामुळे पदोन्नत्या थांबल्या आहेत. दुसरीकडे अनेक शिक्षकांना जुनी पेन्शन नाही, पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाकडे निवेदनाद्वारे वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी आज (शुक्रवारी) शाळा बंद आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात जिल्ह्यातील २९ हजार शिक्षकांपैकी ११ हजार ३१० शिक्षकांनीच सहभाग नोंदवला. शिक्षकांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील चार हजार ४३७ शाळांपैकी केवळ दोन हजार २७५ शाळा बंद होत्या, असे शिक्षणाधिकाऱ्यांकडील माहितीवरून समोर आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शाळांची स्थिती
प्राथमिक शिक्षण विभाग
एकूण शाळा : ३,३५२
एकूण शिक्षक : १४,२००
बंद राहिलेल्या शाळा : २,१६९
आंदोलनात सहभागी शिक्षक : ७,९४८
आंदोलनात नसलेले शिक्षक : ६,५२८
===============
माध्यमिक शिक्षण विभाग
एकूण शाळा : १,०८५
एकूण शिक्षक : १४,५९७
बंद राहिलेल्या शाळा : १०६
आंदोलनात सहभागी शिक्षक : ३,३६२
आंदोलनात नसलेले शिक्षक : ११,२३५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.