शिक्षकांसाठी मोठी बातमी! ३ किलोमीटर परिसरातील २० पट नसलेले नववी-दहावीचे वर्ग होणार बंद; ३ ते ५ कि.मी.वरील शाळांसाठी ‘ही’ सवलत, वाचा...
तात्या लांडगे
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांची २०२५-२६ या वर्षातील संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार आता तीन किलोमीटर परिसरातील ज्या माध्यमिक शाळेतील नववी व दहावीच्या वर्गात प्रत्येकी २० पट नसेल ते वर्ग बंद करावे लागणार आहेत. मात्र, तीन ते पाच किमी अंतरावर शाळा नसल्यास त्या शाळांसाठी ही अट शिथिल केली जाणार आहे. ही सवलत एक वर्षासाठीच असणार आहे.
संचमान्यतेनंतर पहिल्यांदा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे शिक्षणाधिकारी स्तरावर समायोजन होणार आहे. त्यानंतर उपसंचालक स्तरावर समायोजन होईल. हा टप्पा पार पडल्यावर शिक्षकांची रिक्त पदे भरली जातील. संचमान्यतेच्या नव्या २०२४ मधील शासन निर्णयानुसार राज्यातील ८ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पटसंख्येअभावी अतिरिक्त होत आहेत. दरम्यान, नववी व दहावीच्या वर्गांसाठी शिक्षक पदे मंजूर होण्यासाठी किमान २० पटाची अट आहे.
विशेष म्हणजे दोन्ही वर्गात किमान २० पटसंख्या असेल तरच त्या वर्गात शिक्षक पदे मिळणार आहेत. मात्र, या निर्णयामुळे ६०० हून अधिक शाळा बंद पडतील, अशी भीती वर्तविण्यात आली. त्यामुळे विधानभवनात २४ फेब्रुवारीला शिक्षणमंत्र्यांची बैठक पार पडली. त्यात ही पटाची अट काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय झाला असून त्याचा आता शासन निर्णय निघेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
शासन आदेशानुसार होईल कार्यवाही
१५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेसंदर्भात शासन आदेश निघाला आहे. त्यानुसार आता २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. ज्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त झाले, त्यांचे समायोजन होईल. पण, समायोजन व नववी व दहावीच्या वर्गातील किमान पटसंख्येबाबत शिक्षक संघटनांच्या काही मागण्या होत्या. त्यावर शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण संचालकांसमवेत विधानभवनात बैठक झाली होती. त्याचे इतिवृत्त कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले असून त्यानुसार आता शासन आदेश निघेल. त्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल.
- डॉ. श्रीराम पानझडे, उपसंचालक, माध्यमिक शिक्षण
बैठकीतील महत्त्वाचे तीन निर्णय....
(१) ज्या माध्यमिक शाळांमध्ये नववी व दहावीच्या वर्गासाठी शिक्षक मंजूर होतात, अशा शाळेपासून ० ते ३ किमी परिसरात त्याच माध्यमाची दुसरी माध्यमिक शाळा असल्यास १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही केली जाणार आहे. या निर्णयानुसार त्या शाळेतील नववी व दहावीच्या दोन्ही वर्गात किमान २०-२० पटसंख्या बंधनकारक आहे. तेवढा पट नसल्यास त्या शाळेत शिक्षक मंजूर होणार नाहीत.
(२) ज्या माध्यमिक शाळांमध्ये नववी व दहावीच्या वर्गासाठी शिक्षक मंजूर आहेत, पण तेथे सध्या दोन्ही वर्गाची पटसंख्या २०-२० नाही, अशा शाळेपासून तीन ते पाच किमी परिसरातील त्याच माध्यमाची शाळा उपलब्ध नसल्यास संबंधित माध्यमिक शाळेत नववी व दहावीच्या वर्गात २०२५-२६ च्या संचमान्यतेत एकत्रित पटसंख्या ४० बंधनकारक आहे. त्यावेळी त्या शाळेत शिक्षकांची तीन पदे मंजूर होतील.
(३) ज्या माध्यमिक शाळेतील नववी व दहावीच्या वर्गाची पटसंख्या २०-२० नाही आणि त्या शाळेपासून ५ किमीपेक्षा जास्त अंतरात त्याच माध्यमाची दुसरी शाळा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी संबंधित शाळेतील दोन्ही वर्गाचा पट एकत्रित ३० आवश्यक आहे. त्यावेळी त्या शाळेला दोन्ही वर्गासाठी शिक्षकांची तीन पदे मंजूर केली जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

