मोठी बातमी! या वर्षीपासून इयत्ता चौथी, पाचवी, सातवी अन् आठवीच्या विद्यार्थ्यांची होणार शिष्यवृत्तीची परीक्षा; शालेय शिक्षण विभागाचा लवकरच आदेश
सोलापूर : चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवी, आठवी या चार वर्गांसाठी घेण्यात येणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त चौथी व सातवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. प्राथमिक शिक्षक संघटनांच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.
आतापर्यंत चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मात्र, २०१६ पासून त्यात बदल करून पाचवी व आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. याचा मोठा फटका स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी प्राथमिक शाळांना बसला आहे. या बदलामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या घटत चालली आहे. यावर उपाययोजनेबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मे महिन्यात बोलावलेल्या ऑनलाइन बैठकीत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी ही बाब शिक्षणमंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण सहसंचालक यांच्यासह जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारीही उपस्थित होते.
या बैठकीत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व सातवीसाठी सुरू करावी, अशी एकमुखी आग्रही मागणी केली. त्यास शिक्षण आयुक्तांनी तत्काळ हिरवा कंदील दाखवला. तसेच शिक्षणमंत्री भुसे यांनीही अनुकूलता दर्शवली. त्यानुसार यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व पाचवी आणि इयत्ता सातवी व आठवीसाठी घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार लवकरच सरकारी आदेश काढण्यात येणार असून त्यासाठी शिक्षण विभागानेही दुजोरा दिला आहे.
लवकरच निघेल आदेश...
स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी शाळा या चौथी अथवा सातवीपर्यंत आहेत. त्यामुळे पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याचा फटका शाळांना बसला आहे. परिणामी पटसंख्या घटत चालले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याने पालकही आपल्या पाल्यांना या शाळांत दाखल करत नाहीत. ही बाब सर्वच शिक्षक संघटनांनी प्रशासनासह शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानुसार लवकरच आदेश काढण्यात येणार आहे.
- नीलेश देशमुख, राज्य सरचिटणीस, शिक्षक सहकार संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.