मोठी बातमी! संचमान्येत मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षक भरले, पगार थांबविला; अनेक शिक्षक आमदारांचे ‘पीए’, नियुक्ती शाळेत अन्‌ काम दुसरीकडे, वाचा...

संचमान्यतेत पटसंख्येनुसार ठरावीक पदे मंजूर असताना देखील अनेक शैक्षणिक संस्थांनी कागदावर पटसंख्या जास्त दाखवून वाढीव पदे भरली. सरकारी व खासगी अनुदानित सर्व शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती शालार्थ प्रणालीला संलग्न केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. सर्व शाळांची पटसंख्या, संचमान्यतेतील एकूण पदे, कार्यरत व रिक्त पदे पोर्टलवर दिसतात.
Teacher Recruitment

Teacher Recruitment

esakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : संचमान्यतेत पटसंख्येनुसार ठरावीक पदे मंजूर असताना देखील अनेक शैक्षणिक संस्थांनी कागदावर पटसंख्या जास्त दाखवून वाढीव पदे भरली. सरकारी व खासगी अनुदानित सर्व शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती शालार्थ प्रणालीला संलग्न केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. सर्व शाळांची पटसंख्या, संचमान्यतेतील एकूण पदे, कार्यरत व रिक्त पदे पोर्टलवर दिसतात. या पार्श्वभूमीवर आता ज्यादा भरलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारी थांबविण्यात आल्या आहेत.

नागपूर, नाशिकसह अन्य जिल्ह्यात बोगस शालार्थ आयडीद्वारे पगार घेण्याचे प्रकार समोर आले. अनेकांकडे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यता आहेत, पण त्या कार्यालयातील आवक-जावक नोंदवहीत त्याची नोंदच नाही. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील १७ हजार माध्यमिक शाळांमधील तीन लाख शिक्षकांची कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करायला लावली. आता ‘एसआयटी’मार्फत सर्वांची पडताळणी सुरु आहे. याचबरोबर अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या संचमान्यतेतील मंजूर पदांपेक्षा ज्यादा भरलेल्यांची माहिती देखील शालेय शिक्षण विभागाने मागविली आहे.

अनेक शाळांचे यु-डायस क्रमांक चुकीचे तर काही शाळा एकाच यु-डायस क्रमांकावरुन दोनपेक्षा जास्त शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारी काढत होत्या. यापूर्वी वेतनासंदर्भात अडचणी आल्यास शिक्षणाधिकाऱ्यांकडून त्यात दुरुस्ती होऊन पगारी होत होत्या. आता हा प्रकार पूर्णपणे बंद केला आहे. सर्वांच्याच पगारी आता शालार्थ प्रणालीवरील ऑनलाईन माहिती पडताळूनच केल्या जात आहेत. त्यामुळे हजारो शिक्षकांचा मार्च महिन्याचा पगार अजूनही झालेला नाही.

काही आमदारांचे ‘पीए’ शिक्षक अन्‌...

राज्यातील काही आमदार व अन्य लोकप्रतिनिधींचे खासगी स्वीय सहायक शिक्षक आहेत. त्यांची नेमणूक मात्र शाळांमध्ये शिक्षक म्हणून आहे. तरीपण ते लोकप्रतिनिधींसमवेतच कायम असतात. नेमणूक शाळेत असतानाही ज्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक अन्य विभागाकडे आहे. अशा सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती शालेय शिक्षण विभागाने मागविली आहे. त्यांची नेमणूक आता त्याच विभागात पदे मंजूर असल्यास तेथेच केली जाणार आहे.

संचमान्यतेत मंजूर पदांपेक्षा जास्त पदांची भरती

भविष्यात शिक्षक भरती, पटसंख्या, संचमान्यता अशा बाबींमध्ये गैरप्रकार होणार नाही, यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या माहितीचे डिजिटलायझेशन केले आहे. आता संचमान्यतेत जेवढी पदे मंजूर आहेत, तेवढ्यांचेच वेतन होईल. याशिवाय जे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी काम न करता दुसऱ्याच विभागात कार्यरत आहेत, त्यांचीही माहिती मागविली आहे. त्यांच्या बाबतीत देखील स्वतंत्र निर्णय होणार आहे.

- डॉ. श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com