मोठी बातमी! सोलापुरात तीर्थयात्रेस येणाऱ्या भाविकांचे ‘या’ मार्गांवर सर्वाधिक अपघात; मुक्कामाची सोय असूनही एका दिवसात परतण्याची घाई ठरतेय ‘काळ’, वाचा...

सोलापूर जिल्ह्यात दोन वर्षांतील २४८९ रस्ते अपघातांत तब्बल एक हजार ४६८ जणांचा मृत्यू झाला. यात परजिल्ह्यांतून सोलापूर जिल्ह्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. मे-जून आणि नोव्हेंबर-डिसेंबर या सुट्ट्यांच्या काळात सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद वाहतूक पोलिसांकडे आहे.
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दोन वर्षांतील २४८९ रस्ते अपघातांत तब्बल एक हजार ४६८ जणांचा मृत्यू झाला. यात परजिल्ह्यांतून सोलापूर जिल्ह्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. मे-जून आणि नोव्हेंबर-डिसेंबर या सुट्ट्यांच्या काळात सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद वाहतूक पोलिसांकडे आहे. मुक्कामाशिवाय एका दिवसात परतण्याची घाई भाविकांसाठी ‘काळ’ बनल्याचेही दिसून येते.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, पंढरपूरचे श्री विठ्ठल- रुक्मिणी, सोलापूरजवळील तुळजापूरची आई भवानीमाता, श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक परजिल्ह्यांतून येतात. तेथे मुक्कामाची चांगली सोय आहे, तरीपण महामार्गांच्या कनेक्टिव्हिटीमुळे भाविक त्याच दिवशी गावी परतण्याची घाई करतात. अनेकजण ‘पुन्हा पुन्हा जायला येत नाही’ म्हणून येताना गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोक आणतात. यातूनच अनेक अपघात झाले आहेत. पण, भाविकांनी तीर्थदर्शनासाठी आल्यावर घाई करू नये, सोयीच्या ठिकाणी मुक्काम करावा, सलग ड्रायव्हिंग करू नये, वाहतूक नियम पाळावेत, जेणेकरून अपघात होणार नाहीत, असा विश्वास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सोलापुरातील मार्ग, अपघात अन्‌ मृत्यू

(दोन वर्षांतील जानेवारी ते एप्रिलमधील स्थिती)

  • मार्ग अपघात मृत्यू

  • सोलापूर ते कोल्हापूर ६१ ४२

  • सोलापूर ते पुणे १०१ ६७

  • सोलापूर ते अक्कलकोट २४ १९

  • विजयपूर-सोलापूर-येडशी १८ ०४

  • धर्मपुरी ते मोहोळ पालखीमार्ग ८३ ४२

  • सराटी-अकलूज-पंढरपूर-वेळापूर-सांगोला १९ १३

  • म्हसवड-माळशिरस-अकलूज-टेंभुर्णी-कुसळंब ६० ३८

  • वागदरी-अक्कलकोट-नागणसूर ०६ ०४

  • करमाळा-टेंभुर्णी-पंढरपूर-मंगळवेढा-उमदी ६७ ३८

  • म्हसवड-पंढरपूर ०८ ०७

‘आरटीओ’कडील नोंदीनुसार...

  • १) राष्ट्रीय महामार्ग : जानेवारी ते एप्रिल २०२६ या काळात जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवरील २४५ अपघातांत १५५ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत २४७ अपघातांत १३५ जणांचा मृत्यू झाला होता.

  • २) राज्य मार्ग : मागील चार महिन्यांत सोलापूर जिल्ह्यातील राज्य मार्गांवरील २७ अपघातांत १४ अपघात भीषण होते. यात १६ जण ठार झाले आहेत. गतवर्षी याच काळात ५३ अपघात झाले, त्यात ३१ जणांचा मृत्यू झाला होता.

  • ३) जिल्ह्यातील इतर मार्ग : जिल्ह्यातील अन्य मार्गांवर मागील चार महिन्यांत १२८ अपघात झाले, त्यात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी जानेवारी ते एप्रिल या काळात सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक मार्गांवरील १०५ अपघातांत ६४ जण ठार झाले होते.

...तर कमी होतील अपघात

एक दिवसाची सुट्टी काढून किंवा शनिवार- रविवारी सुट्टी असल्याने परजिल्ह्यांतील भाविक तीर्थदर्शनासाठी सोलापुरात येतात. त्यांच्यासाठी रस्ते अनोळखी असतात, चालक सलग ८-१० तास ड्रायव्हिंग करतो. दर्शनानंतर लगेचच घरी परतण्याची त्यांना घाई असते, त्यातूनच अपघात होतात. पण, वाहतूक नियम पाळले, घाई न करता मुक्काम करून तीर्थदर्शन घेतल्यास निश्चितपणे अपघात कमी होतील.

- बाळासाहेब भरणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वाहतूक), सोलापूर ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Lane Change Leads to Deadly Crash Near Solapur; Family Devastated
Accident News
Fatal accident
Jharkhand Accident Six From Same Family Dead
Marathi News Esakal
www.esakal.com